कृषी मंत्री आणि सभापतीच्या भागात शेतकऱ्यांना सहा तास, करमाळ्याला केवळ दोन तास ? ; शेतकऱ्यांमध्ये संताप
करमाळा समाचार प्रतिनिधी

कृषी वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकावरून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यातील उजनी परिसरातील शेतकऱ्यांना सहा तास वीजपुरवठा मिळत आहे. तसेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या कर्जत तालुक्यातील नदीकाठच्या भागातही आठ तास वीज दिली जात असल्याचा दावा केला जात आहे. पण करमाळाच दोन तास का?

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना केवळ दोन तास वीजपुरवठा होत असल्याने शेतीचे नियोजन विस्कळीत झाले असून पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. समान परिस्थिती असतानाही तालुकानिहाय वीजपुरवठ्यात फरक का केला जात आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी महावितरण आणि राज्य शासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन वीजपुरवठ्याचा कालावधी वाढवावा, अशी मागणी केली आहे. तसेच तीनही तालुक्यांतील कृषी वीजपुरवठ्याची अधिकृत माहिती जाहीर करून समान निकष लागू करावेत, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इतर तालुक्यात दमदार नेते आहेत. तर त्या तुलनेने करमाळा तालुक्याची ताकद कमी पडते काय असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने इतर तालुक्यात वीज पुरवठा केला जात आहे. तसाच वीजपुरवठा करमाळा तालुक्यात ही व्हावा यासाठी सर्व नेते मंडळींनी आपली ताकद लावण्याची गरज आहे.
टीप : इंदापूर, कर्जत आणि करमाळा तालुक्यातील वीजपुरवठ्याबाबतचे दावे संबंधित शेतकरी व स्थानिकांकडून करण्यात आले असून याबाबत महावितरण किंवा संबंधित लोकप्रतिनिधींची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप उपलब्ध झालेली नाही.

