करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

न्यायालयाच्या आदेशानंतर करमाळा पोलिसांत खुनासह गंभीर कलमांखाली 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा, प्रतिनिधी :

करमाळा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 175(3) अंतर्गत करमाळा पोलीस ठाण्यात रावगाव येथील ज्ञानेश्वर ढाकणे यासंह 10 जणांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, धमकी व इतर विविध गंभीर आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शुभम वसंत केकान (वय 26, रा. रावगाव, ता. करमाळा) यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, रावगाव येथील गट क्रमांक 255 मधील शेतीच्या मालकी व वहिवाटीवरून दोन्ही पक्षांमध्ये महसूल व दिवाणी न्यायालयात वाद सुरू होते. या सर्व प्रकरणांमध्ये आरोपींना यश मिळाले नसल्याने ते फिर्यादीच्या कुटुंबावर राग धरून असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, 20 जून 2026 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास फिर्यादी स्वतःच्या शेतात ट्रॅक्टरने मशागत करत असताना आरोपी तेथे आले. त्यांनी ट्रॅक्टर बंद करून फिर्यादी, त्यांचे वडील व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना मारहाण केली. काही आरोपींकडे दगड, काठ्या व धारदार चाकू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मारहाणीत फिर्यादीचे वडील वसंत निवृत्ती केकान यांना छातीवर गंभीर मार लागल्याचा आरोप असून, उपचारासाठी रुग्णालयात नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात बरगड्या फ्रॅक्चर झाल्याचा उल्लेख असल्याचेही फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. तसेच इतर काही जणांनाही गंभीर दुखापत झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर त्यांनी करमाळा पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार देण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने अखेर न्यायालयात धाव घेण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतर करमाळा पोलिसांनी संबंधित 10 आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE