मनोहर मामा प्रकरणाचा तपास की आणखी काही? प्रा. रामदास झोळ प्रकरणामुळे नवे प्रश्न
करमाळा समाचार – प्रतिनिधी

मनोहर मामा भोसले प्रकरणातील तपासाची व्याप्ती वाढत असताना आता राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडेही पोलिसांचे लक्ष वळल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हा तपास केवळ आर्थिक गैरव्यवहार आणि गुन्हेगारी कृत्यांपुरता मर्यादित आहे की त्याला राजकीय संदर्भही आहेत, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

मनोहर भोसलेविरोधात आर्थिक फसवणूक आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, एप्रिल-मे २०२६ मध्ये त्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे.
या प्रकरणात आर्थिक हितसंबंध असल्याच्या आरोपावरून यापूर्वी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. तपास पूर्ण होऊन चार्जशीट दाखल झाल्यानंतरही त्या व्यक्तीविरुद्ध नेमके कोणते ठोस आर्थिक पुरावे न्यायालयीन प्रक्रियेत पुढे आले, हा प्रश्न मात्र अद्याप चर्चेत आहे. विशेष म्हणजे संबंधित व्यक्ती अद्याप कारागृहात असल्याने तपास, आरोप आणि प्रत्यक्ष पुरावे यातील फरकाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आता रामदास झोळ यांच्या नावाची चर्चा
या पार्श्वभूमीवर प्रा. रामदास झोळ यांचे नाव समोर येत आहे. दत्तकला शिक्षण संस्थेशी संबंधित परिसरात पोलिसांकडून तपासणी सुरू असल्याचे वृत्त असून, मनोहर भोसले यांच्याशी कथित आर्थिक संबंधांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी होत असल्याचे समाज माध्यमात सांगण्यात आले आहे. झोळ हे पोलिसांच्या हाती लागले नसल्याची चर्चा असली तरी त्यांना आरोपी घोषित करण्यात आले आहे किंवा ते अधिकृतपणे फरार आहेत, याची पोलिसांकडून स्पष्ट पुष्टी अद्याप झालेली नाही.

म्हणूनच या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, पोलिसांच्या हाती नेमके कोणते पुरावे लागले आहेत?
मनोहर भोसले आणि रामदास झोळ यांच्यात प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार झाला आहे का? झाला असल्यास तो किती रकमेचा आहे? त्या व्यवहाराचा गुन्ह्याशी थेट संबंध आहे का? की केवळ संपर्क किंवा संबंधांच्या आधारे तपासाचा विस्तार केला जात आहे? या प्रश्नांची उत्तरे अधिकृत तपासातूनच समोर येणे आवश्यक आहे.
सरकारविरोधातून सत्तेच्या जवळ… आणि आता तपास?
रामदास झोळ यांनी यापूर्वी सरकारविरोधी भूमिका घेत राजकीय संघर्ष केला होता. त्यानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत ते सरकारच्या राजकीय वर्तुळात आले आहेत, अशी स्थानिक राजकीय चर्चा आहे. त्यामुळेच आता त्यांच्याविरोधातील पोलिस कारवाईकडे केवळ कायदेशीर तपास म्हणून पाहायचे की त्यामागे राजकीय समीकरणांचाही काही भाग आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
“सरकारविरोधात भूमिका घेतल्यानंतर आता सरकारच्या जवळ आलेल्या व्यक्तीवर अचानक कारवाईची दिशा का बदलली?”
“ही केवळ योगायोगाने घडलेली तपासाची प्रक्रिया आहे की राजकीय संघर्षाचा परिणाम?” या प्रश्नांची उत्तरे सध्या कोणाकडेही निश्चित नाहीत. तपास निष्पक्ष असणे गरजेचे गुन्हा गंभीर असेल तर आरोपी कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, तपास झाला पाहिजे. आर्थिक व्यवहारांचे पुरावे असतील तर ते न्यायालयासमोर आले पाहिजेत. मात्र त्याचवेळी केवळ राजकीय संबंध, एखाद्या व्यक्तीशी असलेली ओळख किंवा पूर्वीची राजकीय भूमिका यावरून कोणालाही दोषी ठरवणे योग्य ठरणार नाही.
मनोहर मामा प्रकरणाचा तपास पुढे जात असताना आता “पुरावा कुठे आहे?” हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत आहे.
कारण तपास यंत्रणेकडे ठोस पुरावे असतील तर कारवाईचे स्वागतच झाले पाहिजे; मात्र जर राजकीय वैरातून तपासाची दिशा ठरवली जात असेल, तर ते लोकशाहीसाठी अधिक गंभीर प्रकरण ठरेल.
म्हणूनच आता लक्ष पोलिसांच्या पुढील कारवाईकडे — आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे न्यायालयात सादर होणाऱ्या पुराव्यांकडे लागले आहे.
रामदास झोळ यांच्यावरील आरोप काय?
मनोहर भोसलेशी नेमका आर्थिक संबंध कोणता?
पोलिसांच्या तपासात काय हाती लागले?
आणि या कारवाईमागे राजकीय सूडाचा कोणताही संदर्भ आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासाच्या अधिकृत कागदपत्रांतूनच स्पष्ट होणार आहेत.


