प्रभाग क्रमांक ४च्या विकासासाठी १० कोटी ७० लाखांचा निधी द्या : भाजप नगरसेविका स्वातीताई फंड
करमाळा : प्रतिनिधी

करमाळा शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील विविध विकासकामांना गती देण्यासाठी तब्बल १० कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका सौ. स्वातीताई महादेव फंड यांनी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रभाग क्रमांक ४ मध्ये लोकसंख्या वाढत असून नागरिकांच्या दैनंदिन गरजांच्या तुलनेत उपलब्ध नागरी सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था तसेच महिलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामे तातडीने हाती घेण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनानुसार, कृष्णाजीनगर येथे ७ ते ८ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये, कृष्णाजीनगरमधील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण व गटार बांधकामासाठी २ कोटी रुपये, गणेशनगर येथील रस्ते काँक्रिटीकरण व गटार बांधकामासाठी २ कोटी रुपये, शाहूनगर येथील रस्ते काँक्रिटीकरण व गटार बांधकामासाठी २ कोटी रुपये, भवानी नाका परिसरातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण व गटार बांधकामासाठी १ कोटी ५० लाख रुपये, तर गणेशनगर येथे महिला भवनासाठी ७० लाख रुपये, अशा एकूण १० कोटी ७० लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
या विकासकामांसाठी करमाळा नगरपरिषद तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रभागातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देऊन आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी नगरसेविका सौ. स्वातीताई महादेव फंड यांनी केली आहे.



