श्री. सिद्धेश्वर विद्यालयाच्या २०१३ बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
हिसरे, ता. करमाळा :

श्री सिद्धेश्वर विद्यालय, हिसरे येथील इयत्ता दहावी बॅच २०१३ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (दि. २० सप्टेंबर) उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल तेरा वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शालेय जीवनातील आठवणी पुन्हा जागवल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक श्री. बाबुशा जगदळे सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री. शहाजी सरडे सर उपस्थित होते. तसेच फंड सर यांच्यासह शैलेश जाधव, राजेश कांबळे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन, मित्रमैत्रिणींसोबतचे अनुभव आणि शाळेने दिलेले संस्कार याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. अनेक वर्षांनंतर जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटल्याचा आनंद यावेळी वातावरणात जाणवत होता.

यानंतर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. “तुम्ही असेच शाळेत येत रहा. तुम्ही आज वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करत आहात, याचा आम्हाला अभिमान वाटतो,” अशा भावनिक शब्दांत शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शाळेशी आणि शिक्षकांशी असलेले नाते कायम जपावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी विविध मनोरंजनात्मक खेळ, जुन्या आठवणींच्या गप्पा, सामूहिक छायाचित्रण आणि स्नेहभोजनाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश ननवरे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागेश पाटील, राजेश ठोंबरे, अक्षय जगदाळे, विजय भोगे, बालाजी आडगळे, किरण भोसले यांच्यासह २०१३ बॅचच्या सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.


