करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा तालुक्यात उजनी काठावर चोरांचा उच्छाद; एकाच रात्रीत १० मोटारींच्या तांब्याच्या तारा लंपास!

दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांचे अडीच लाखांचे नुकसान; रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी
करमाळा (प्रतिनिधी) :

राज्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना, उरल्यासुरल्या पाण्यावर पिके जगविण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता चोरीचे संकट उभे ठाकले आहे. उजनी जलाशयाच्या बॅकवॉटर परिसरातील दिवेगव्हाण-पारेवाडी भागात २३ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल १० कृषी विद्युत मोटारी फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पारेवाडी येथील नाना सरवदे यांच्या शेताजवळ उजनी जलाशयाच्या बॅकवॉटरमधून पाईपलाईनद्वारे परिसरातील शेतकरी शेतीला पाणीपुरवठा करतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी १० मोटारींचे नटबोल्ट उघडून तसेच मोटारींची बाडी फोडून आतील अंदाजे १०५ किलो तांब्याची तार चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी दिवेगव्हाण येथील शेतकरी अभिमन्यू संभाजी खाटमोडे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हा रजि. नं. ०८४६/२०२६ अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरी झालेल्या मोटारींमध्ये अभिमन्यू खाटमोडे यांच्या अँकोटेक्स व लुबी कंपनीच्या तीन, भरत खाटमोडे यांच्या टेक्समो कंपनीच्या दोन, उमेश खाटमोडे यांच्या दोन, तसेच सतीश खाटमोडे, गणपत खाटमोडे आणि अक्षय तनपुरे यांच्या प्रत्येकी एका मोटारीचा समावेश आहे. या मोटारी १५ एचपी व ७.५ एचपी क्षमतेच्या आहेत.

मोटारींची नव्याने वाईंडिंग करणे, खराब झालेले कव्हर बदलणे, दुरुस्ती, वाहतूक व पुन्हा बसविणे यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या सर्व मोटारी दुरुस्त करण्यासाठी सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे.
उजनी पट्ट्यात मोटार-केबल चोरीच्या घटना वाढल्या
दिवेगव्हाण, वाशिंबे, सोगाव, हिंगणी, गोयेगाव, पारेवाडी, केत्तूर, पोमलवाडी, खातगाव आणि राजुरी या उजनी बॅकवॉटर परिसरात गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांच्या मोटारी व केबल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही भागात दर १५ ते २० दिवसांनी अशा घटना घडत असल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी केली आहे.

चोरट्यांकडून प्रामुख्याने मोटारी फोडून त्यातील तांब्याच्या तारा काढून नेल्या जात असल्याने या घटनांमागे सराईत टोळी असण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत तपासातूनच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी
उजनीच्या बॅकवॉटरलगतचा मोठा ग्रामीण व शेतशिवाराचा परिसर असल्याने रात्री पोलिसांची नियमित गस्त वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. चोरीच्या घटनांचा तपास करून आरोपींचा शोध घ्यावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी पेट्रोलिंग करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

“मोटारी बसवण्यासाठी कर्ज काढले, आता पुन्हा खर्चाचा डोंगर”
“आमचा संपूर्ण भाग सध्या दुष्काळाच्या भयंकर झळा सोसत आहे. पारेवाडी तलावात पाणीसाठा नाही आणि विहिरींचे स्रोतही आटत चालले आहेत. बँकेचे कर्ज काढून आम्ही उजनीतून पाईपलाईन आणली आणि मोटारी बसवल्या. मात्र, चोरांनी मोटारी फोडून तांब्याच्या तारा नेल्याने आमच्यावर पुन्हा मोठा आर्थिक भार पडला आहे. या भागात रात्री पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज आहे. पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन कारवाई करावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
– अभिमन्यू खाटमोडे, नुकसानग्रस्त शेतकरी, दिवेगव्हाण

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE