करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

कथित बनावट NOC प्रकरणी विहाळ ग्रामपंचायतीची पोलिसांत तक्रार ; विहाळ येथील कारखान्याच्या अडचणीत वाढ़?

करमाळा :

मौजे विहाळ येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. (सध्याचे नाव शिवगिरी अॅग्रो इंडस्ट्रिज प्रा. लि.) यांच्याकडे सन 2022-23 पासून ग्रामपंचायत करापोटी ₹14 लाख 93 हजार 578 रुपयांची थकबाकी असल्याचा दावा विहाळ ग्रामपंचायतीने केला आहे. थकीत कर वसुलीसाठी मागणी हुकूम बजावूनही रक्कम जमा न झाल्याने आता जप्तीची कारवाई करण्याची तयारी ग्रामपंचायतीने सुरू केली आहे. शिवाय NOC साठी बनावट सही शिक्का वापरल्याने पोलिसात तक्रार दिल्याने ग्रामपंचायत व कारखाना यांच्यातील वाद पेटला आहे.

ग्रामपंचायतीच्या माहितीनुसार, थकीत कराच्या वसुलीसाठी वेळोवेळी मागणी बिले देण्यात आली असून, मात्र, अद्याप थकीत कराची रक्कम जमा झालेली नसल्याचे ग्रामपंचायतीने म्हटले आहे.

दरम्यान, कारखान्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (MPCB) Consent to Operate Renewal मिळविण्यासाठी 15 मार्च 2025 रोजीचे ग्रामपंचायत विहाळचे कथित बनावट ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) सादर केल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. या NOC वर सरपंच पूजा मोहन मारकड यांच्या सहीची नक्कल तसेच ग्रामपंचायतीचा कथित बनावट शिक्का वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

RTI अंतर्गत प्राप्त कागदपत्रांमध्ये 15 मार्च 2025 रोजी असे कोणतेही NOC ग्रामपंचायतीने दिल्याची जावक रजिस्टरमध्ये नोंद नसल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले आहे. या प्रकरणी संबंधित कागदपत्रांच्या आधारे कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

या कथित बनावट NOC प्रकरणी 10 सप्टेंबर 2026 रोजी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून FIR नोंद न झाल्याने 6 ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्याकडे दाद मागणार असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE