पक्षनिष्ठेची पोचपावती की करमाळ्यातील नव्या नेतृत्वाचा उदय?
करमाळा समाचार

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीसपदावर कार्यरत असलेले गणेश चिवटे यांची नुकतीच जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर झाली आणि त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडल्याचे या निवडीतून स्पष्ट झाले. देशात आणि महाराष्ट्रात सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या पक्षाचे जिल्हाध्यक्षपद मिळणे ही त्यांच्या कार्याची मोठी पोचपावती मानली जात आहे. या पदामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याला नवी दिशा मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

करमाळा तालुक्यात गटातटाचे राजकारण ही नवी बाब नाही. स्थानिक नेता ज्या पक्षात जातो, त्या पक्षाचा झेंडा कार्यकर्ते उत्साहाने मिरवतात. मात्र गणेश चिवटे यांचा प्रवास यापेक्षा वेगळा राहिला. त्यांनी राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून प्रामुख्याने भारतीय जनता पक्षात राहून संघटनात्मक काम केले. काही अपवाद वगळता त्यांनी पक्षनिष्ठा कायम राखली आणि त्याच निष्ठेचे फळ म्हणून त्यांना विविध जबाबदाऱ्या मिळत गेल्या. जिल्हाध्यक्षपद ही त्या प्रवासातील महत्त्वाची पायरी ठरली आहे.
चिवटे यांच्यावर पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास असल्याचे त्यांच्या निवडीवरून दिसून येते. पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे त्यांना मिळणारे मार्गदर्शन आणि पाठबळ ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जाते. त्यामुळे जिल्हाभर पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी ते प्रभावीपणे पार पाडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षांत चिवटे यांनी तालुक्यात सातत्याने संघटन वाढवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक राजकीय वजनही वाढताना दिसत आहे.

पक्षाच्या बळावर स्वतःचा प्रभावी कार्यकर्ता गट उभा करणारे ते करमाळ्यातील उदयोन्मुख नेतृत्व म्हणून पुढे येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, मोठी राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी घेतलेली ही झेप उल्लेखनीय आहे. आता जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्या पदाचा आणि प्रभावाचा लाभ करमाळा तालुक्याच्या विकासासाठी होईल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. विशेषतः कुकडी-रिटेवाडी पाणीप्रश्न, एमआयडीसीसह तालुक्यातील अनेक रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गणेश चिवटे यांना मिळालेली ही जबाबदारी केवळ एका पदाची नियुक्ती नसून, त्यांच्या पक्षनिष्ठेची, संघटन कौशल्याची आणि सातत्यपूर्ण कार्याची पोचपावती आहे. आता या विश्वासाचे रूपांतर विकासकामांमध्ये करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल. करमाळा तालुक्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ते कितपत यशस्वी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

