उजनीच्या पाण्याच्या हक्काबाबत स्पष्टता द्या; खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची शासनाकडे मागणी
करमाळा समाचार :

उजनी जलाशयाशी संबंधित प्रस्तावित प्रकल्पासाठी पाण्याचा नेमका वापर किती होणार, शीतकरणासाठी किती पाणी लागणार, पाण्याचा पुनर्वापर कितपत केला जाणार आणि Floating Solar प्रकल्पामुळे होणारी पाणीबचत किती असेल, याबाबत शासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे.

दुष्काळी परिस्थितीत या प्रकल्पाला पाणी देण्याचे निकष काय असतील, विद्यमान पाणीवापराच्या तुलनेत प्रकल्पासाठी किती अतिरिक्त पाण्याची आवश्यकता भासेल, याचीही स्पष्टता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
तसेच, या प्रकल्पामध्ये अणुभट्टी अथवा Small Modular Reactor (SMR) प्रस्तावित आहे का? याबाबत शासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
उजनी जलाशयावर सोलापूर जिल्ह्यासह अनेक भागातील पिण्याचे पाणी, शेती, सिंचन, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे विद्यमान लाभार्थ्यांचे पाण्याचे हक्क, भविष्यातील पाण्याची गरज आणि दुष्काळी परिस्थिती यांचा विचार करूनच प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेणे आवश्यक असल्याचे खासदार मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.

उजनीच्या पाण्याच्या हक्काचे संरक्षण आणि स्थानिक जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य मिळावे, यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा विभाग तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे पत्रव्यवहार केला आहे. प्रकल्पातील पाणीवापर, तंत्रज्ञान आणि दुष्काळी परिस्थितीतील पाणीवाटपाबाबत शासनाने अधिकृत माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


