40 वर्षांचा संघर्ष संपवला! तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या पुढाकाराने वरकुटे-अळसुंदे शिवपानंद रस्ता अखेर खुला!
प्रशासकीय कौशल्य, कायदेशीर मार्गाचा अवलंब आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांप्रती संवेदनशीलता; तहसीलदारांच्या भूमिकेचे ग्रामस्थांकडून कौतुक
करमाळा समाचार :


वरकुटे-अळसुंदे या गावांना जोडणाऱ्या शिवपानंद रस्त्याचा तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी या प्रश्नात पुढाकार घेत प्रशासकीय पातळीवर योग्य मार्ग शोधून काढला आणि २६ नोव्हेंबर रोजी हा रस्ता खुला करण्यात यश मिळवले. त्यांच्या या कामगिरीमुळे अनेक वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांना अखेर न्याय मिळाला आहे.
सन २००९ मध्ये तत्कालीन तहसीलदारांनी उबाळे-मुलाणी यांनी सदर रस्त्यास अडथळा करू नये, असा आदेश दिला होता. मात्र, त्यानंतरही रस्त्याचा प्रश्न सातत्याने वादग्रस्त राहिला. या प्रकरणात उबाळे यांच्याकडून महसूल मंत्री, उच्च न्यायालय आणि वनविभागाकडे विविध तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे रस्ता खुला करण्याच्या प्रक्रियेत अनेक कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या.

रस्त्याचा प्रश्न सुटावा यासाठी वरकुटे-अळसुंदे येथील ग्रामस्थांनी उपोषण, रास्ता रोको यांसारखी आंदोलने केली. न्यायालयीन स्थगिती आदेश आणि तांत्रिक अडचणींमुळे हा प्रश्न अनेक वर्षे रखडला होता. मात्र, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत उपलब्ध कायदेशीर व प्रशासकीय पर्यायांचा विचार करून रस्ता खुला करण्याचा मार्ग शोधला.
केवळ आदेश देण्यापुरती भूमिका न ठेवता, प्रत्यक्ष प्रश्न समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. २६ नोव्हेंबर रोजी शिवपानंद रस्ता खुला झाल्याने ग्रामस्थांचा अनेक वर्षांचा संघर्ष संपुष्टात आला आहे.
अधिकाऱ्यांची खरी ओळख ही त्यांच्या पदावरून नव्हे, तर सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्यांनी केलेल्या कामातून निर्माण होते. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दाखवून दिलेली ही प्रशासकीय तत्परता आणि लोकाभिमुख भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या पुढाकारामुळे वरकुटे-अळसुंदे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.


