करमाळाकृषीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

एसएनएफ (SNF) व फॅटच्या बाबत शासनाने तातडीने स्पष्ट धोरण जाहीर करावे – दूध उत्पादकांची मागणी

करमाळा (जि. सोलापूर)

करमाळा तालुक्यातील केम पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकरी, दूध डेअरी संचालक व संकलन केंद्र चालक यांच्या संयुक्त बैठकीत दुधातील एसएनएफ (Solids-Not-Fat) आणि फॅट या निकषांबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शासनाने याबाबत स्पष्ट धोरण व अधिकृत परिपत्रक तातडीने जारी करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा फॅट व SNF कमी लागल्याने संबंधित गायवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

सध्या अनेक दूध संकलन केंद्रांवर दुधाची प्रत तपासताना एसएनएफ कमी असल्याचे कारण देऊन दूध उत्पादकांना कमी दर दिला जात आहे किंवा काही ठिकाणी दूध स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. मात्र, एसएनएफचे निकष, तपासणीची प्रमाणित पद्धत आणि त्यासंदर्भातील शासनाचे स्पष्ट परिपत्रक उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून त्याचा आर्थिक फटका थेट दूध उत्पादकांना बसत आहे.

बैठकीत उपस्थित दूध उत्पादकांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, “आम्ही दुधातील भेसळीचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करत नाही. भेसळमुक्त दूध हा ग्राहकांचा हक्क असून त्यासाठी कठोर कारवाई व्हावी. मात्र, एसएनएफच्या नावाखाली प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये. शासनाने स्पष्ट नियमावली जाहीर करून सर्व दूध संघ व संकलन केंद्रांसाठी समान निकष लागू करावेत.”

ad

शेतकऱ्यांनी यावेळी तुकाराम मुंडे साहेबांनी भेसळविरोधात घेतलेल्या भूमिकेचे समर्थन व्यक्त केले. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, मात्र प्रामाणिक शेतकऱ्यांना अन्याय होणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

दूध संकलन केंद्र चालकांनीही आपल्या अडचणी मांडताना सांगितले की, दूध संघाकडून कमी एसएनएफ असल्याचे कारण देऊन दूध नाकारले किंवा कमी दर दिला जात असल्याने त्याचा आर्थिक भार संकलन केंद्रांवर येतो. ग्रामीण भागात जनावरांचा चारा, हवामानातील बदल, वैरणीतील बदल आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे एसएनएफमध्ये चढ-उतार होऊ शकतात. अशा परिस्थितीत केवळ मशीनवरील आकड्यांच्या आधारे दूध नाकारणे किंवा दर कपात करणे अन्यायकारक आहे.

बैठकीत शासनाकडे पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या:

एसएनएफ व फॅट तपासणीबाबतचे स्पष्ट व अधिकृत शासन परिपत्रक तातडीने प्रसिद्ध करावे.

राज्यभर सर्व दूध संघांसाठी समान निकष लागू करावेत.

नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या एसएनएफमधील बदलांचा वैज्ञानिक अभ्यास करून त्यानुसार धोरण निश्चित करावे.

भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी; मात्र प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची हमी द्यावी.

दूध उत्पादक, संकलन केंद्र चालक व दूध संघ यांच्यात समन्वय साधून कायमस्वरूपी तोडगा काढावा.

राज्य शासनाने या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून दूध उत्पादक शेतकरी, दूध संघ आणि संकलन केंद्र चालक यांच्यात समन्वय साधावा, अन्यथा राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला.

यावेळी दूध डेअरी मालक व चेअरमन अरुण लोंढे, कालिदास तळेकर, प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर तसेच दूध उत्पादक शेतकरी सतीश खानट, चंद्रकांत बीचीतकर, सतीश देवकर, दत्ता चव्हाण, सुनील तळेकर, सुनील चव्हाण, सोमनाथ तळेकर, माधव गुटाळ, निलेश गुटाळ, अक्षय पाटील, अरुण डोंगरे (चालक), बापू पळसकर, गलांडे तळेकर यांच्यासह केम पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE