अवैधरीत्या दारु विक्री करणाऱ्या चाळीस वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल ; करमाळा पोलिसांची कारवाई
करमाळा समाचार
तालुक्यात आजही छुप्या पद्धतीने हातभट्टी दारू विकली जाते असे दिसुन येते. अशा ठिकाणी पोलिसांची नजर चुकून हा धंदा केला जात असल्याचे दिसून आले आहे. आपल्या परिसरात कुठे अशा पद्धतीने व्यवसाय सुरू असेल तर थेट करमाळा पोलीस ठाण्याची संपर्क साधला पाहिजे व अशा अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करायला भाग पाडले पाहिजे.

हातभट्टी व देशी दारूची अवैधरित्या विक्री करताना अशाच एका महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. सदरची महिला ही लांडाहिरा दहिगाव परिसरात दारू विक्री करत असल्याचे आढळून आले आहे. सदरची कारवाई ही 20 जुलै रोजी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस नाईक खंडागळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पर्वत व पोलीस नाईक कल्याण फरतडे यांच्या पथकाने केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे पथकासह पेट्रोलिंग करण्यासाठी जेऊर दूरक्षेत्र हद्दीमध्ये गेले होते. यावेळी दहिगाव तालुका करमाळा येथील हद्दीत लांडाहिरा वस्ती येथे एक महिला राहत्या घराच्या आडोशाला देशी दारू व हातभट्टी दारूची बेकायदेशीर विक्री करीत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले.
यावेळी संशयित महिला घराच्या आडोशाला पांढऱ्या रंगाची पिशवी प्लास्टिकचे कॅन्ड घेऊन बसलेली होती. तिच्या वर संशय आल्याने पोलिसांनी तिला गराडा घालून पकडले. यावेळी त्या महिलेस नाव विचारले असता तिने सिंधू बर्डे वय 40 असे नाव सांगितले. तिच्याकडून पांढऱ्या रंगाच्या पिशवीत 17 देशी दारू संत्रा कंपनीच्या सीलबंद बाटल्या व एक प्लास्टिकचे कॅन त्यामध्ये वीस लिटर आंबट उग्र घाण वासाची हातभट्टी दारू असा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर मुद्देमान जप्त करून महिलेवर करमाळा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हातभट्टी सारख्या विषारी दारुने अनेक जण मृत्युमुखी पडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा दारूपासून सावध राहिलेले बरे. आपल्या एका दुर्लक्षामुळे अशा लोकांचे फावते आहे. त्यामुळे युवकांना सदर दारूपासून परावृत्त करून विकणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी सामाजिक, कार्यकर्ते गाव पुढाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे असे प्रकार आपल्या परिसरात घडत असतील तर करमाळा पोलीस ठाण्यात संपर्क करा.