करमाळासोलापूर जिल्हा

राजुरीत दोन एकर ऊस जळून खाक ; महावितरण ने धोकादायक लाईन शोधुन दुरुस्त करावी

करमाळा समाचार -संजय साखरे

राजुरी तालुका करमाळा येथील शेतकरी गंगाराम भागवत आहेरकर यांचा गट नंबर 56 मधील 265 जातीचा तोडणी योग्य झालेला ऊस सकाळी साडेअकरा वाजता विजेच्या शॉर्टसर्किटने जळाला असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. त्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सध्या राजुरी च्या निम्म्या भागाला कोर्टी वीज उपकेंद्रा वरून विजेचा पुरवठा होतो. उपकेंद्राचा ट्रांसफार्मर नेहमी ओव्हरलोड चालत असल्याकारणाने दिवस पाळीला सावडी पाच तास व राजुरी पाच तास असा वीज पुरवठा होत आहे. असे असून सुद्धा राजुरी सर्किट ओव्हरलोड चालत असल्याकारणाने तारेला तार चिकटणे ,जम्प तुटणे असे प्रकार वारंवार होत आहेत .

यामुळे आज आहेरकर यांच्या शेतातील विजेच्या खांबावर ठिणग्या पडल्या आणि उसा ने पेट घेतला. उसामध्ये नेटाफेम कंपनीचे ठिबक सिंचन होते. ते देखील पूर्णपणे जळून खाक झाले आहे. त्यांच्या शेजारी तुटलेला उस असल्याकारणाने त्या उसाच्या पाचोळ्याने मोठ्या प्रमाणावर पेट घेतला आणि आगीने रौद्र स्वरूप धारण केले.

यामध्ये आहेरकर यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे कोर्टी वीज उपकेंद्राला मंजूर झालेल्या पाच एम .व्ही क्षमतेच्या अतिरिक्त ट्रांसफार्मर चे काम लवकर सुरू करण्यात यावे , राजुरी साठी स्वतंत्र सब स्टेशन निर्मितीचा प्रश्न लवकर मार्गी लावावा व महावितरणने अशा धोकादायक लाइनचा शोध घेऊन तात्काळ त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.

जळालेल्या उसाची माहिती घेतली जाईल. चौकशी केली जाईल व त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
सुमित जाधव, उपअभियंता, करमाळा महावितरण

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE