भात शिजवणारा पण झाला डॉक्टर ! बोगसगिरी कधी थांबणार ?
करमाळा समाचार
एखाद्या खासगी दुकानात काम करणारा कामगार ज्या पद्धतीने सर्व माहिती घेऊन स्वतः दुकान टाकतो. त्याप्रमाणे डॉक्टरांची अवस्था झाली आहे. प्रशिक्षित डॉक्टरांसह बोगस डॉक्टरांच्या सोबत काम करून आता बनावट पदव्या तयार करून बरेचसे महाभाग स्वतःला डॉक्टर म्हणून घेत आहे व नागरिकांवर उपचार करत आहेत. असाच प्रकार जनावरांच्या उपचारांमध्येही सुरू आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष असलेले आरोग्य मंत्री तानाजी सावंत व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे या दोन्ही खात्याचे मंत्री आहेत. हे या प्रकाराकडे लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे ?

वैद्यकीय शिक्षण लाखो रुपये खर्च करून शिक्षणाचा खर्च उचलत असलेल्या विद्यार्थ्यांना आता शिक्षण घ्यावी का नाही असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. सध्याच्या परिस्थितीत गावोगावी बोगस डॉक्टरांची चलती झाली आहे. संबंधित विभाग या प्रकरणात मूग घेऊन गप्प असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य यंत्रणेकडे बोगस डॉक्टरांची कल्पना व संपूर्ण माहिती उपलब्ध असतानाही त्यांच्यावर कारवाई करता येत नसेल तर यापेक्षा दुर्दैव कोणते असणार आहे.

बनावट पदव्या घेऊन तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुळव्याध भगंदर या रोगांशिवाय विविध रोगांवर उपचार केले जात आहेत. या उपचारादरम्यान लोकांना घातक औषधांचा मारा करून तात्पुरत्या स्वरूपाचे निदान केले जाते व रुग्ण वेळीच बरा झाल्याचा आनंद घेऊन घरी जातो. पण कालांतराने घातक औषधांच्या माऱ्यामुळे त्याला जीवाशी मुकावे लागू शकते किंवा एखादा अवयव निकामी होईल याची त्याला पुसटशी कल्पना सुद्धा येत नाही. त्यामुळे वेळीच अशा बनावट डॉक्टरांवर कारवाई करणे गरजेचे असतानाही केवळ कारवाईचा देखावा केला जातो. परंतु या बोगस डॉक्टरांचा खेळ थांबवला जात नाही. अशीच परिस्थिती जनावरांच्या डॉक्टरांमध्येही असून आज-काल उठ सूट कोणीही कसल्याही प्रकारची अधिक माहिती नसताना जनावरांना तपासून त्यांना औषधी देत आहे. त्यामुळे जनावरांच्याही जीविताला धोका निर्माण झाला आहे.
भात शिजवणारा डॉक्टर ..
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात एका गावात एक बनावट डॉक्टर रुग्णांना तपासत असे त्या डॉक्टरकडे भात शिजवण्यासाठी एक मुलगा कामाला होता. कालांतराने त्याने कसा इलाज केला जातो याची माहिती घेतली व तो आता स्वतःच डॉक्टर म्हणून इतरांचा इलाज करत आहे. अशा डॉक्टरांच्या उपचाराकडे उपचार घेतल्यानंतर रुग्णाचे पुढे काही होईल याचे सांगता येत नाही. तसेच बऱ्याच लोकांना यामुळे त्रासही झाला आहे. परंतु समोर येऊन तक्रार करत नसल्यामुळे अशा डॉक्टरांचे फावते आहे.
कारवाई शुन्य ..
बोगस डॉक्टरांना कोणतीही विचारना होत नाही. परंतु जे अधिकृत नोंदणीकृत डॉक्टर आहेत त्यांची वारंवार कागदपत्रांची तपासणी केली जाते. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. या सर्व बाबींचा करमाळा मेडीकोज गिल्ड चे अध्यक्ष यशवंत व्हरे व उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.