करमाळा अहिल्यानगर रस्त्यावर अपघात ; अपघातात युवा वकील ठार
करमाळा समाचार

संबंधित वकील हे पुणे येथे कार्यरत होते.

देवीचामाळ ता. करमाळा येथील शिक्षिका मंगवडे मॅडम यांच्या सुपुत्राचा दुर्दैवी अपघात झाला असून यात तो जागीच ठार झाला आहे. सदरची घटना कामोणे फाटा अहमदनगर टेंभुर्णी रस्त्यावर घडली आहे. यावेळी अज्ञात कारणाने सदरचा अपघात झालेला दिसून आला. अजिंक्य सुभाष मंगवडे वय 35 असे मयत व्यक्तीचे नाव आहे. अजिंक्यचे आई वडील दोघेही शिक्षक आहेत.
मूळचे मलवडी येथील मंगवडे कुटुंबीय नोकरीच्या निमित्ताने करमाळा शहर व जेऊर परिसरात वास्तव्य करीत असल्याने दोन्हीही भागात त्यांच्या परिचयाचे अनेक जण आहेत. सदरच्या अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अजिंक्य मंगवडे हे पुणे येथे वकिली करत असल्याची माहिती आहे. काही दिवसांपासून ते करमाळा येथे स्थायिक झाले होते.

अजिंक्य यांचा त्यांच्या कुटुंबीयाशी रात्री उशिरा संपर्क झाला. त्यानंतर सकाळी थेट साडेसहाच्या सुमारास अपघाताबाबत माहिती मिळाली. त्यामुळे नेमका अपघात कसा झाला हे बऱ्याच लोकांना माहित नाही. तर किती वाजता झाला याचीही कल्पना नाही. केवळ गाडीच्या पाठीमागून धक्का दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यातून गाडी घसरून सदरचा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी मंगवडे यांच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली असून ते जागीच ठार झाले. त्यांना करमाळा येथील रुग्णालयात आणण्यात आले.
करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर पुढील कार्यवाही सुरू आहे.


