काठावरील सत्ताधाऱ्यांना फुटाफुटीची चिंता ; अनेकांची सहल अज्ञातस्थळी
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या त्यानंतर आता 11 तारखेला सरपंच घोषित होणार आहेत. पण अनेक ठिकाणी काठावर सत्ता मिळवलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पळवापळवी ची भीती असल्याने अनेक जण सध्या सहलीवर गेल्याचे चित्र दिसून येत आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा फटका इतर तीन तालुक्यांना बसला आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आठ तालुक्यातील सरपंच निवडीला स्थगिती दिली आहे. उत्तर सोलापूर, करमाळा व मंगळवेढा या तीन तालुक्यातील निवडी दोन फेब्रुवारी च्या आदेशानुसार कराव्यात असे आदेश दिले आहेत. मोहोळ, सांगोला, माळशिरस, पंढरपूर या चार तालुक्यात बरोबरच बार्शी, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व माढा या तालुक्यातील सरपंच निवडी पुढील आदेशापर्यंत स्थगित केले आहेत. त्यामुळे दिनांक 11 रोजी करमाळा येथे सरपंच निवडी केल्या जाणार आहेत.
करमाळा तालुक्यात अनेक गावांमध्ये स्थानिक गटाने एकत्र येऊन निवडणुका लढवल्या खऱ्या पण त्यांची एकी निवडणुकीनंतर टिकेल का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुळातच स्वतःला सरपंचपद मिळावे या आशेने अनेक जण कधीही कोलांट्या उड्या मारून दुसरीकडे जाऊ शकतात. तर काही एखाद्याला अद्दल शिकवण्यासाठी दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कधी कोणता सदस्य कुठे फुटून कसा जाईल याचा नेम नसल्याने अनेकांनी सध्या तालुक्याच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी आपले सदस्य नेण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे देवळाली, मांगी, बोरगाव अशा गावातील सरपंच निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
