सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या पथकाकडून अवैध धंद्यावर छापा ; दारुसाठा जप्त
करमाळा समाचार

सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा (करमाळा उपविभाग) यांच्या आदेशानुसार, करमाळा पोलिसांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. दिनांक 24 मे 2026 रोजी पोलिसांनी मौजे केम गावच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण 95,235/- रुपये किमतीची देशी-विदेशी दारू आणि बिअरचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात होते अशी कुजबुज आहे.

पहिली कारवाई:- हॉटेल दुर्गालगतच्या पत्रा शेडवर छापा (एकूण मुद्देमाल 87,920/- रु.) दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 10/27 वा.च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस कॉन्स्टेबल अनिल मोहन निकम व निर्भया पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, केम येथील हॉटेल दुर्गाच्या शेजारील पत्राच्या शेडमध्ये बेकायदेशीर दारू विक्री सुरू आहे. पोलिसांनी पंचांसमक्ष तात्काळ सदर ठिकाणी छापा टाकला. पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महादेव शिवाजी दोंड (वय 58, रा. केम, ता. करमाळा) या इसमास पोलिसांनी जागीच पकडले. त्याच्या ताब्यातून किंगफिशर, बडवायझर, दुबर्ग कंपनीच्या बिअर, ग्रँड मास्टर वोडका, ब्लेंडर प्राईड, रॉयल स्टॅग, मॅकडॉल नंबर 1 यांसारख्या नामवंत कंपन्यांची विदेशी व्हिस्की व देशी दारू टँगो पंच आणि संखू संत्रा असा एकूण 87,920/- रुपयांचा विनापरवाना साठा जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई:- लोहार गल्ली, बसेश्वर चौकात छापा (मुद्देमाल: 7,315/- रु.) त्याच दिवशी दुपारी 14/35 वाजेच्या सुमारास केम दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल गोरख घुगे यांना मिळालेल्या माहितीवरून, केम गावातील लोहार गल्लीतील बसेश्वर चौकालगत असलेल्या एका पत्राच्या शेडच्या आडोशाला छापा टाकण्यात आला. तेथे दोन पांढऱ्या रंगाच्या पिशव्यांसह संशयास्पदरीत्या बसलेला इसम सचिन हनुमंत घाडगे (वय 38, रा. केम, ता. करमाळा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या पिशव्यांची झडती घेतली असता, त्यात देशी दारू टँगो पंच, ऑफिसर्स चॉईस, रॉयल स्टॅग, इम्पेरियल ब्लू आणि मॅकडॉल व्हिस्की अशा एकूण 7,315/- रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या मिळून आल्या.

यातील दोन्ही आरोपींकडे दारू बाळगण्याचा कोणताही वैध परवाना किंवा पास मिळून न आल्याने, त्यांच्याविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल पुढील तपासासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊराव शेळके यांनी ताब्यात घेतला आहे. नमुद दोन्ही गुन्हयाचा तपास पोहवा/1828 भाऊराव शेळके ने करमाळा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक:-
सदर धडक कारवाई सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाचे पोहवा मंगेश पवार, पोकॉ संभाजी पवार, चापोकॉ गणेश गुटाळ, पोकॉ अनिल निकम, केम दूरक्षेत्राचे पोहेकॉ भाऊराव शेळके आणि पोकॉ अमोल घुगे यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

