करमाळ्यात बार्शी विजयी पण मन जिंकले गजानन संघाने
करमाळा समाचार – (karmalaCricket)
करमाळा येथे आयोजित क्रिकेट सामन्यांमध्ये बार्शी येथील बार्शी इलेव्हन या संघाने करमाळा येथील गजानन संघाचा चुरशीच्या सामन्यात पराभव करीत टेनिस चेंडूवरील मालिका जिंकली आहे. अंतिम सामन्यात सहा षटकात ८७ धावांचा पाठलाग करताना गजानन संघाच्या बापू सावंत याची बारा चेंडू मध्ये ३८ धावांची चमकदार खेळी अपयशी ठरली. त्याला रोहित परदेशी ने चांगली साथ दिली. शेवटच्या चेंडुपर्यत रंगलेल्या सामन्यात बार्शी संघाचा आठ धावांनी विजयी झाला आहे. सदरच्या स्पर्धांचे आयोजन अमित बुदृक व सहकाऱ्यांनी केले होते.

करमाळा तालुक्यासह बाहेर तालुक्यातील बार्शी, दौंड, कर्जत, जामखेड व परांडा परिसरातून एकूण ३२ संघ या ठिकाणी सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक करमाळ्याचे पोलीस सुहास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी येथील बार्शी इलेव्हन या संघाने ५५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. द्वितीय गजानन स्पोर्ट क्लब ३३ हजार रुपये, तृतीय मॉर्निंग ग्रुप टेंभुर्णी २२ हजार तर चतुर्थ कुगाव ता. करमाळा येथील संघाने ११ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे. सदर स्पर्धेत तालुक्यातील बलाढ्य संघांचा पराभव करीत गजानन संघाने अंतिम फेरी पर्यंत दिलेली कडवी झुंज ही मन जिंकणारी ठरली.
सदरच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणारा बापू सावंत याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर मालिकावीर म्हणून मिलिंद दामोदरे (मुंबई पोलिस) यांना एक सायकल भेट देण्यात आली. उत्कृष्ट गोलंदाज नंदकुमार शिंदे (बार्शी) यांना सन्मानित करण्यात आले.

सदरच्या सामन्याच्या अंतिम पारितोषिक वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, नगरसेवक संजय सावंत, नगरसेवक अतुल फंड, अभिजीत पाटील, योगेश सोरटे, दिनेश कानगुडे, प्रतीक सावंत, सुनील फुलारी, रितू कांबळे, आयोजक अमित बुद्रूक आदि उपस्थित होते. तर पंच व समालोचक म्हणून रितेश कांबळे, अक्षय कांबळे, आनंद जगदाळे, आनंद भांगे, प्रतीक शेडगे यांच्यासह गजानन स्पोर्ट क्लब यांनी काम पाहिले.