आदिनाथ कारखान्यावर दावा करणाऱ्या आ. रोहित पवारांनी हेतु जाहीर करावा
करमाळा समाचार
आसपासच्या कारखान्यांवर जवळपास ५०० कोटींपेक्षा जास्त कर्ज असताना ते कारखाने आज व्यवस्थित सुरू आहेत. तर त्यापेक्षा निम्म्या कर्जात आपला आदिनाथ कारखाना बंद ठेवून केवळ भीती निर्माण केली जात आहे. पण सदरच्या कारखान्यासाठी चांगले सदस्य सोबत घेऊन कारखाना पुन्हा एकदा उभा करू असा विश्वास बोलुन दाखवत येणाऱ्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर करीत आदिनाथ संदर्भात झोळगटाचे प्रमुख प्रा. रामदास जवळ यांनी विरोधी गटांना आव्हान दिले आहे.

श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याने सध्या सर्वच गट तट पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रा. झोळ यांच्या गटाची ही करमाळ्यात बैठक पार पडली. बैठकीदरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांकडून सल्ला मसलत करून निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावेळी इतर सर्व गट जनतेची दिशाभूल करून एकत्र येतात व शेतकरी व कामगारांना वाऱ्यावर सोडतात. त्यामुळे आपण स्वतंत्र लढण्याचा निर्णय घ्यावा असे आवाहन सभासद व शेतकऱ्यांमधून झाल्यानंतर प्राध्यापक झोळ यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना झोळ यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. सदरच्या निवडणुकीत प्रक्रियेत सलग तीन वर्षाच्या उस घालण्याच्या नियमावर निर्णय घेणे गरजेचे असून याशिवाय जवळपास ५००० मयत मतदार असण्याची शक्यता आहे. त्यांचेही नावे जाहीर करून त्यांना निवडणूक प्रक्रियेतून बाजूला काढण्याचे आवाहन केले. याशिवाय बंद कारखान्याला उसाचा नियम लागू करू नये अशीही मागणी यावेळी यांनी केली. तसेच मकाईच्या निवडणुकीत इतर सर्व गटातटांनी माघार घेत निवडणूक एकतर्फी करण्यास बागल यांना सहकार्य केले होते. त्यामुळे त्यांच्यावर आपला विश्वास नसल्याचे त्यांनी सांगितले.

तर चांगले लोक पुढे आणून निवडणूक लढवणार असून येणाऱ्या काळात अडचणीत आलेला कारखाना पुन्हा एकदा उभा करण्यासाठी प्रयत्न करू असे जाहीर केले. आदिनाथ ज्यावेळी अडचणीत होता त्यावेळी एकाही गटाकडून एक रुपयाची ही मदत करण्यात आली नाही. त्यामध्ये मोहिते पाटील, नारायण पाटील, संजय मामा शिंदे व बागल गट या सर्वांचा सहभाग असून आर्थिक सहकार्य कोणीही केले नसल्याचे यावेळी झोळ यांनी सांगितले. आमच्या नेतृत्वात संचालक मंडळ निवडणूक जिंकल्यानंतर संचालकाच्या ग्यारंटीवर आम्ही पैसे उभा करू व कारखाना चालून दाखवू असेही यावेळी जाहीर केले. तर कोणत्याही पक्षात जाणार नसून आपले सर्व पक्षांची चांगले संबंध आहेत त्याचा फायदा घेऊन कारखाना सुस्थितीत आणू असे जाहीर केले. यावेळी शेतकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष दशरथ कांबळे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील हे उपस्थित होते.
रोहित पवारांचा नेमका हेतु काय ?
भाडेतत्त्वावर देण्यासाठी सुरुवातीला पाठिंबा देणाऱ्या दशरथ कांबळे यांनी त्या काळजी ती परिस्थिती असल्याने तशी भूमिका घेण्यात आली होती असे सांगितले. पण कारखाना अडचणीत असताना आणखी अडचणीत आणण्याचा प्रयत्न आ. रोहित पवार यांच्याकडून केला जात आहे असेही ते म्हणाले. नुकतेच पवारांनी आदिनाथ कारखान्यावर एक दावा दाखल केला आहे. त्यामध्ये कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचे कबूल करून कारखाना न देता आमचे आर्थिक नुकसान केल्याचा दावा बारामती ॲग्रो चे चेअरमन रोहित पवारांकडून करण्यात आला आहे अशी माहीती देताना यामागे रोहित पवारांचा नेमका हेतू काय आहे त्यांनी तो जाहीर करावा असे आवाहन यावेळी उपस्थित असलेल्या शेतकरी कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी केला.