आ. शिंदे अजितदादांसोबत गेल्याने नव्या चेहऱ्यांना नेतृत्वाची संधी
करमाळा समाचार
राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यामुळे आता तालुक्यातील समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदललेले दिसून येत आहेत. विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे जरी अपक्ष असले तरी अजितदादा यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीसोबत कायम होते. पण आता अजितदादा वेगळा गट घेऊन भाजपसोबत गेल्याने तालुक्यातील राजकारणामध्ये राष्ट्रवादीला नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे. यासाठी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष वारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, जिल्हा परिषद सदस्या राणी वारे यांच्याकडे पाहिले जात आहे.

बागल गटाने राष्ट्रवादी सोडल्यानंतर मोजकेच कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचे नेतृत्व करू लागले होते. मोठे नेतृत्व नसल्यामुळे राष्ट्रवादी अतिशय कमकुवत झालेली दिसून येत होती. त्या परिस्थितीही तळागाळातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी टिकून ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला. पुन्हा एकदा सर्वांना एकत्र आणण्यात राष्ट्रवादीची उभारणी करण्याची प्रयत्न सुरू होते. तरीही राष्ट्रवादीला तुल्यबळ उमेदवार मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे माढा तालुक्यातील घाटणेकरांना करमाळा विधानसभेसाठी संधी देण्यात आली. पण ऐनवेळी त्यांना माघार घेत अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला व ते निवडून आले.

माजी आमदार जयवंतराव जगताप व इतर मित्र पक्षांच्या ताकदीवर संजय मामा शिंदे यांचा विजय सोपा झाला होता. त्यामुळे ते कोणत्याच एका पक्षाकडे जाणे टाळत होते. त्यामुळे ते कायमच अजितदादांना जरी आपला नेता मानत असले तरी ते राष्ट्रवादी पासून अंतर ठेवून काम करताना दिसत होते. तालुक्यातील विविध गटातील नेत्यांचे प्रवेशही राष्ट्रवादीत होण्याऐवजी शिंदे गटात होताना दिसत होते. त्यावेळीही पुन्हा बाळालांनी जसे स्वतःचे कार्यकर्ते राष्ट्रवादी पदाधिकारी केले. तसेच काही कार्यकर्ते मामांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी बनवले होते. त्यामुळे मामांनी अजित दादांना पाठिंबा दिल्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीची अवस्था बिकट झाली आहे.
तर आता तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा बळकटी आणण्यासाठी सक्रिय व्यक्तींना समोर आणणे गरजेचे आहे. त्यांना ताकद देणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीसाठी उपयुक्त असे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष वारे व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणी वारे अशी नावे पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले आहे. बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष व पवार कुटुंबीयांचे जवळचे असलेले सुभाष गुळवे तालुक्याच्या राजकारणात अपेक्षेपेक्षा कमी लक्ष देताना दिसून येतात ते आता लक्ष घालतील का त्यावर राष्ट्रवादीचे भवितव्य ठरणार आहे.
शिवाय राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संतोष वारे यांची शरद पवार साहेबांवर निष्ठा असून जयंत पाटील यांच्या जवळचे मानले जातात. तसेच त्यांचे व आमदार निलेश लंके यांचीही चांगले संबंध आहेत. परंतु निलेश लंके यांनी अजित दादा यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे संतोष वारे हे कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष होते. परंतु त्यांनी राष्ट्रवादीशी एकनिष्ठता दाखवत शरद पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले. त्यांचे ग्रामीण भागात मोठा संपर्क असून दिवंगत आमदार दिगंबरराव बागल यांच्या माध्यमातून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली होती. वारे यांनी तळागाळातील लोकांपर्यंत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य राणी वारे यांची नावं राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्यासाठी समोर येण्याची शक्यता आहे.