करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पिकांचे नुकसान; शेतकरी बापू उबाळे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या!

पाण्याअभावी ऊस, केळी, उडीद, तूर, मूग, मटकी, मका पिकांचे नुकसान; बापू उबाळे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

करमाळा : प्रतिनिधी

करमाळा तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके संकटात सापडली असून अनेक भागांत विहिरी व बोअरवेल आटू लागल्या आहेत. पाण्याअभावी ऊस, केळी तसेच उडीद, तूर, मूग, मटकी, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असून तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा शेतकरी बापू उबाळे यांनी केला आहे.

तालुक्यात खरीप हंगामात उडीद, तूर, मूग, मटकी, बाजरी, कांदा आदी पिकांची सुमारे २५ हजार ५३६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. मात्र गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने जिरायती क्षेत्रातील पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके जळून गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जमिनींना भेगा पडल्या असून विहिरी व बोअरवेलमधील पाणीसाठाही कमी होत आहे.

पूर्व भागात मका तसेच अन्य खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. ऊस पिकांनी माना टाकल्या असून केळी बागांनाही पाणीटंचाईचा फटका बसला आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, वाडशिंगे, मांगी, कोळे, नेरले, पारेवाडी, राजुरी, हिंगणी व म्हसेवाडी येथील तलाव प्रकल्पांतील पाणीसाठा संपल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन दुष्काळी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

पावसाअभावी झालेल्या नुकसानीची सरसकट पाहणी करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच तालुक्यातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बापू उबाळे यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE