दुष्काळ जाहीर होताच पंचनाम्यांना वेग; करमाळ्यात २७ हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
करमाळा :

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता प्रशासनाकडून पीक नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग आला आहे. करमाळा तालुक्यात पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनाम्याची पाहणी व कार्यवाही सुरू केली आहे.

पंचनाम्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून सुमारे १२३ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजअखेर तालुक्यातील २३ टक्के क्षेत्रातील पंचनामे पूर्ण झाले असून, सुमारे ३० हजार खातेदारांचे आणि २७ हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
दुष्काळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासनाच्या मदतीसाठी पंचनाम्यांना महत्त्व आहे. त्यामुळे पंचनामे अचूक व वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

“पुढील आठवड्यात तालुक्यातील सर्व पंचनामे पूर्ण करण्यात येतील,” अशी माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली.


