पोटेगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीवरून शेतकरी आक्रमक; साडेचार कोटींच्या कामाची चौकशी करण्याची मागणी
पोटेगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीवरून शेतकरी आक्रमक; साडेचार कोटींच्या कामाची चौकशी करण्याची मागणी
ठेकेदाराचे बिल रोखण्याची मागणी; ५ ऑक्टोबरला कमलाई चौकात रास्ता रोको आंदोलन

करमाळा : करमाळा तालुक्यातील पोटेगाव हद्दीतील सीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामावरून परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तब्बल साडेचार कोटी रुपये खर्चाच्या या कामाची गुणवत्ता, प्रत्यक्ष मोजमाप, वापरण्यात आलेले साहित्य आणि कामाची तांत्रिक तपासणी याबाबत शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले असून, संपूर्ण कामाची निष्पक्ष चौकशी करावी तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल रोखावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सन १९८८ मध्ये मंजूर झालेल्या या बंधाऱ्यावर पोटेगाव, बालेवाडी, निलज, पोथरे, बोरगाव, संगोबा आदी गावांतील शेतकऱ्यांचे शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेले दुरुस्तीचे काम दर्जेदार आणि टिकाऊ असणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, दुरुस्तीचे काम समाधानकारक नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी या संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी
दुरुस्तीच्या कामाबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी करण्यात आल्या असून, संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कागदपत्रांपुरती पाहणी न करता प्रत्यक्ष बंधाऱ्यावर येऊन कामाची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कामाची गुणवत्ता, वापरलेले साहित्य, प्रत्यक्ष झालेला खर्च, कामाचे मोजमाप आणि निर्धारित तांत्रिक निकष यांची स्वतंत्रपणे तपासणी करावी. चौकशीत अनियमितता किंवा दोष आढळल्यास संबंधित ठेकेदारासह जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
‘चौकशीपूर्वी बिल अदा करू नये’
दुरुस्तीचे काम समाधानकारक नसल्याचा आरोप होत असताना ठेकेदाराचे बिल अदा करण्याची घाई का केली जात आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बिल रोखण्यात यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
या कामामागे राजकीय वरदहस्त असल्याचा आरोपही काही शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच अधिकारी आणि ठेकेदार यांच्या भूमिकेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, या आरोपांबाबत संबंधित ठेकेदाराची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप उपलब्ध झालेली नाही.
अभियंता सौंदणे म्हणाले, ‘उद्या प्रतिक्रिया देतो’
या प्रकरणी संबंधित अभियंता सौंदणे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता, “मी बाहेर आहे. मला काहीच माहिती नाही. त्यामुळे मी उद्या प्रतिक्रिया देतो,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या पुढील प्रतिक्रियेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
५ ऑक्टोबरला कमलाई चौकात रास्ता रोको
पोटेगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाची निष्पक्ष चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बिल रोखावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, या मागण्यांसाठी सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता कमलाई चौक, बायपास रोड येथे परिसरातील शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी व चौकशीचे आदेश देणार का, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीवर खर्च झालेल्या निधीचा पारदर्शकपणे हिशेब समोर आणून कामाची वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, प्रांताधिकारी माढा-कुर्डुवाडी, तहसीलदार करमाळा तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने तातडीने बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


