फार्मर आयडीची अट रद्द करून सरसकट फार्मर आयडीची अट रद्द करा
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची तहसीलदारांकडे मागणी; भोगवटा वर्ग-२ जमिनीवरील ‘पोटखराबा’ नोंदी दुरुस्त करण्याचीही मागणी
करमाळा (विशेष प्रतिनिधी) :

सोलापूर जिल्ह्यासह करमाळा तालुक्यात निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी लागू करण्यात आलेली ‘फार्मर आयडी’ची अट तात्काळ रद्द करावी आणि संपूर्ण तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून पंचनामे करावेत, अशी मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवा संघटक यशपाल कांबळे यांनी करमाळा तहसीलदारांना लेखी निवेदन दिले.

निवेदनात भोगवटा वर्ग-२ मधील जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावरील ‘पोटखराबा’ नोंदींच्या समस्येकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. प्रत्यक्षात लागवड होत असतानाही काही जमिनींच्या उताऱ्यावर क्षेत्र ‘पोटखराबा’ म्हणून नोंदविले गेले असल्याने ऑनलाइन प्रणालीमध्ये लागवडीखालील क्षेत्र शून्य दाखविले जात आहे. त्यामुळे ॲग्रीस्टॅक प्रणालीवर अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार होत नसून ते पीकविमा, दुष्काळी नुकसानभरपाई तसेच विविध शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पंचनाम्यांसाठी फार्मर आयडीची अट शिथिल अथवा रद्द करून प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भोगवटा वर्ग-२ जमिनीवरील प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत्राची नोंद ७/१२ वर अचूक करण्यासाठी महसूल विभागाने विशेष मोहीम राबवावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

प्रत्यक्ष जमिनीचे स्थळपंचनामे करून शेतकऱ्यांना लागवड क्षेत्राची नोंद दुरुस्त करण्याची संधी द्यावी, तसेच वर्ग-२ जमिनीवरील ‘पोटखराबा’ नोंदींबाबत शासनाने स्पष्ट व सुधारित धोरण जाहीर करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
“तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. प्रशासनाने शासनाकडून तातडीने मार्गदर्शन घेऊन ॲग्रीस्टॅक प्रणालीतील त्रुटी दूर कराव्यात. प्रश्न तातडीने सोडविला नाही तर शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा यशपाल कांबळे यांनी दिला.
निवेदनाच्या प्रती पक्षाचे राष्ट्रीय नेते व प्रदेशाध्यक्ष संजय (भैय्या) सोनवणे, सोलापूर जिल्हाधिकारी, करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी आणि करमाळा पोलीस निरीक्षक यांना माहितीस्तव देण्यात आल्या.
यावेळी आरपीआयचे अमोल कदम यांनी मागणीला जाहीर पाठिंबा दिला. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे नूतन तालुकाध्यक्ष अमोल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव भोसले, तालुका सरचिटणीस रोहित लांडगे, शहराध्यक्ष रणजीत कांबळे, राहुल गायकवाड, मयूर कांबळे, आकाश कांबळे, आप्पा कांबळे, रोहित कांबळे, रोहन भोसले, विश्वनाथ भोसले, मारुती मस्तुद, शिवाजी वाघमोडे, विश्वनाथ वाघमोडे, मनोज पवार, विकास तळेकर, सुभाष पानसरे, अमन इनामदार, विकास किरवे, नितीन पोळ, महेश काळे, अमोल उघडे, विठ्ठल कदम, नागनाथ कदम, संजय ताकतोडे, गणेश पवार, धनराज सरोदे, बाबा पोळ आदी उपस्थित होते.


