करमाळासोलापूर जिल्हा

तो पुन्हा आलाय ! शेतकऱ्यासमोर बिबट्याने ओढत नेले शेळ्यांना

करमाळा समाचार 


तालुक्यातील उंदरगावातून थेट कात्रज येथे मोर्चा वळवत त्याठिकाणी दोन शेळ्या व एका वासराचा बळी घेऊन बिबट्या पुन्हा एकदा पसार झाला आहे. उंदरगाव व कात्रज दोन्ही ठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेटी दिल्या नंतर माहिती घेऊन अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली आहे. तर उद्या मोहोळ येथून इतर अधिकारी घेऊन पुढील कारवाई करणार आहेत. वासरु रात्री तर शेळ्यांवर मंगळवारी दुपारी शेतकऱ्यासमोर हल्ला झाला आहे. दिलासादायक बातमी अशी की तो नरभक्षक नाही .

सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास उंदरगाव येथे दुचाकीवरुन जाणाऱ्या हनुमंत नाळे यांना वीस फुटाच्या अंतरावर बिबट्या दिसून आला होता. त्यावेळी त्यांनी लागली सर्वत्र सूचना देऊन परिसरात माहिती कळवली. त्यामुळे परिसरातील लोकात सतर्कता निर्माण झाली. तर बिबट्या आल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.

रात्री बिबट्याने उंदरगाव ते कात्रज दहा ते पंधरा किमी चा पट्टा पार केला आहे. बिबट्याने कात्रज परिसरात दोन शेळ्या व एका वासरावर झडप मारून तिघांनाही ठार केले आहे. वासराला रात्री तर शेळ्यांना दुपारी तीनच्या सुमारास शेतकऱ्यांसमोर ओढत नेल्याने हा प्रकार उघडकीस आला.

कात्रज ता. करमाळा येथील किशोर पाटील यांच्या वस्तीवर रात्री एका वासराचा फडशा पाडुन बिबट्याने पुर्ण वासराला फस्त केले होते. पण याबाबत दुपार पर्यत पाटील यांनी वाच्यता न केल्याने हे प्रकरण कोणाच्या लक्षात आले नाही. नंतर दुपारी बाळकृष्ण सोनवणे यांच्या शेताशेजारील ओढ्याजवळ गावातील शेतकरी शंकर पाटील हे शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेले होते.

त्यावेळी बिबट्याने दोन शेळ्यांवर हल्ला केला व ओढत घेऊन जात असताना पाटील यांचे लक्ष गेले. शेतकरी व इतर लोक तिथे जाई पर्यत बिबट्याने शेळीच्या नरडीचा घोट घेऊन धुम ठोकली होती. यावेळी वन विभागाचे वनमजुर नारायण चव्हाण यांनी उंदरगाव येथील ठसे व कात्रज येथील पाहणी करुन वरिष्ठाना याबाबत अहवाल दिला आहे. तर प्रथमदर्शनी तो बिबट्याच असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता बुधवारी मोहोळ येथील अधिकारी येऊन पाहणी करुन पुढील कार्यवाही करणार आहेत.

आम्ही काल सोमवारी दिवसभर रामवाडी ता. करमाळा परिसरात कामानिमित्त होतो. रात्री बिबट्या दिसल्याबाबत फोन झाल्यावर आज करमाळा वनविभागाचे कर्मचारी तिथे पाठवले आहेत. उंदरगाव व कात्रज दोन्ही ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली आहे. अहवाल प्राप्त होईल. तर बुधवारी आमचे पथक त्याठिकाणी भेट देणार आहे.
– डी. डी. साळुंखे, वनपाल, मोहोळ.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE