आयपीएस अधिकाऱ्यांचा करमाळ्यात धमाका; करमाळा पोलीस गाफिल आयपीएस कडून जुगार अड्ड्यांवर छापा
करमाळा समाचार

एकापाठोपाठ एका आयपीएस अधिकाऱ्याचा धमाका करमाळेकरांना पाहायला मिळत आहे. तालुका पातळीवर असलेल्या पोलिसांना अद्याप गुन्हे कुठे चालतात हे कळण्याआधीच आयपीएस अधिकारी मात्र त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई करताना दिसत आहेत. मागील अनेक दिवसांपासून धडक कारवाई करणाऱ्या अंजली कृष्णा या बार्शी येथे प्रभारी कारभार सांभाळत असताना टेंभुर्णी येथे कारभार सांभाळणारे आयपीएस अधिकारी राहुल आत्राम यांनी करमाळ्यात छापा टाकून जुगारींना ताब्यात घेतले आहे.

करमाळा तालुक्यात ठीकठिकाणी अवैध धंदे जोमात सुरू असल्याच्या तक्रारी बऱ्याच वेळा ऐकलेल्या होत्या. परंतु जेव्हापासून आयपीएस अंजली कृष्णा यांनी करमाळा तालुक्यात सह माढा तालुक्याचा कारभार हातात घेतला आहे. तेव्हापासून करमाळा तालुक्यात उघडपणे तसेच अंधारातूनही चालू असणाऱ्या अवैध धंद्यावर चाप बसला आहे. त्यामुळे सर्वत्र अंजनी कृष्णा यांची चर्चा होती. त्याचाच एक भाग म्हणून त्यांना सध्या बार्शी येथील प्रभारी चार्ज दिल्यामुळे त्या सध्या तिकडेही कार्यरत आहेत. एका कारवाईत बार्शीत गुटखा कारवाईत 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तालुक्यात अंजनी कृष्णा या नाहीत हे लक्षात आल्यानंतर पुन्हा एकदा अवैध धंद्याने डोके वर काढल्याचे दिसून आले. परंतु आयपीएस अंजनी कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी येथील परीक्षार्थी आयपीएस राहुल आत्राम यांनी करमाळा तालुक्यातील वांगी क्रमांक एक येथे छापा टाकून जवळपास 50 हजार रुपयांचा रोख रक्कम व मोठ्या प्रमाणावर मोटरसायकल तसेच एक कार गाडी जप्त केली आहे अशी माहिती मिळत आहे. सदरची कार्यवाही झाल्यानंतर पुन्हा एकदा करमाळा पोलीस व संबंधित ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी काय करत असतात? हा मोठा प्रश्न विचारला जात आहे.

या प्रकरणाची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सदरच्या प्रकरणात सात ते आठ व्यक्तींवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. तर मोटरसायकल कार गाड्या यासह लाखोंचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आहे. रात्री उशिरा त्या ठिकाणाहून खुर्च्या गाड्या सह पोलीस करमाळा पोलीस ठाण्यात पोहोचले. पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.

