त्यांनी चुका केल्या म्हणून तुम्हीही त्याच चुका करणार का? ; आर्थिक नाडी, कामगार, शेतकरी यांचे भविष्य पणाला
करमाळा समाचार

आदिनाथ सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा भाडे तत्त्वावर देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, मागील वेळी कारखाना भाडे तत्त्वावर देण्यास ज्या नेत्यांनी कडाडून विरोध केला होता, तेच आता ही प्रक्रिया पुढे नेताना दिसत आहेत. दुसरीकडे, त्यावेळी भाडे तत्त्वावर देण्यास विरोध न करणारे आता विरोधाची भूमिका घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

भूमिका बदलण्यामागे नेमके कारण काय, हा प्रश्न उपस्थित होत असला तरी त्याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या राजकीय संघर्षात आदिनाथ कारखान्याचे आणि त्याच्याशी निगडित शेतकरी व कामगारांचे नुकसान होत नाही का?
“त्यांनी चुका केल्या म्हणून तुम्हीही त्याच चुका करणार का?” असा सवाल सर्वसामान्य सभासद आणि शेतकरी उपस्थित करत आहेत. कारखान्याच्या भवितव्यापेक्षा राजकीय भूमिका आणि परस्परविरोध यांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. आदिनाथ हा केवळ एक कारखाना नसून हजारो ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि त्यांच्या कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून कारखान्याच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

“पुढाऱ्यांच्या वादात शेतकरी आणि कामगारांचे नुकसान का?” हा प्रश्न आज पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी ज्यांनी प्रक्रियेत भाग घेतला व भाडेतत्त्वावर घेतलेले बारामती ॲग्रो पुन्हा एकदा त्या रेसमध्ये असू शकतात. तर मग त्यांची तयारी असेल तर त्यांच्याकडेच का दिला जात नाही असाही यातून वादाचा मुद्दा समोर येणार आहे. पण राजकीय घडामोडी बदलल्यामुळे मागील विषय गुलदस्त्यात ठेवण्याचा विचार असला तरी बारामती ॲग्रो शांत बसेल असे वाटत नाही. त्यांनी न्यायालयात गेल्यानंतर सदरचा विषयी पुन्हा एकदा हाणून पाडण्याची पाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी सामंजस्याने यातून तोडगा काढून पुढील निर्णय घ्यावेत. अन्यथा पुन्हा त्याच गोष्टी समोर येऊन आदिनाथचेच नुकसान होणार आहे.


