करमाळा मतदारसंघातील मांगी व प्रस्तावित केम एम.आय.डी.सी बाबत विधानसभेत आवाज
करमाळा प्रतिनिधी

करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी करमाळा तालुक्यातील मांगी येथील एम.आय.डी.सी उर्वरित कामे तसेच प्रस्तावित केम येथे नवीन एम.आय.डी.सी स्थापन करण्याबाबत आ.श्री.नारायण(आबा) पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले.

करमाळा तालुका भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी असूनही औद्योगिक विकासाच्या बाबतीत मागे राहिला आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे स्थलांतर करावे लागत आहे. उद्योगधंद्यांच्या अभावामुळे तालुक्याच्या आर्थिक प्रगतीलाही मर्यादा येत आहेत.
आ.नारायण (आबा) पाटील यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी मांगी येथील एम.आय.डी.सी चा विषय तातडीने मार्गी लावावा तसेच केम येथे नवीन एम.आय.डी.सी ची स्थापना करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.

केम येथे अनेक वर्षांपासून कुंकू तयार करणारे कारखाने कार्यरत असून, येथे उत्पादित होणारे कुंकू आपल्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे देशभरात नावाजलेले आहे. या पारंपरिक उद्योगाला योग्य पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्राची जोड मिळाल्यास कुंकू उद्योगाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच स्थानिक कारागीर,महिला बचतगट आणि लघुउद्योजकांनाही केम येतील एम.आय.डी.सी चा मोठा लाभ होणार आहे.
तसेच मांगी आणि केम येथे एम.आय.डी.सी.चा विषय मार्गी लागल्यास मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू होतील,हजारो युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होईल, तसेच कृषी प्रक्रिया उद्योग, लघु व मध्यम उद्योग, वाहतूक, गोदाम व्यवस्था आणि सेवा क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल. यामुळे करमाळा तालुक्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवी दिशा मिळेल.
या महत्त्वाच्या विषयावर आ. नारायण (आबा) पाटील यांनी विधानसभेत प्रभावीपणे आवाज उठवत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी केली. करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

