करमाळासोलापूर जिल्हा

एम. बी. कोष्टी उत्कृष्ट आरोग्य सेवक पुरस्कार दिलीप डोळस यांना प्रदान

प्रतिनिधी – करमाळा

आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल करमाळा तालुक्यातील साडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रायगाव उपकेंद्राचे आरोग्य सेवक दिलीप डोळस यांना यंदाचा एम. बी. कोष्टी उत्कृष्ट आरोग्य सेवक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

करमाळा येथील आरोग्य सेवक महादेव बाळा कोष्टी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त येथील यश कल्याणी सेवाभवनमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी मनोज राऊत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा बोंगडे, हिवताप पर्यवेक्षक परमेश्वर वाडेकर, यश कल्याणी संस्थेचे गणेश करे – पाटील, कुरुहीन शेट्टी कोष्टी समाजाचे तालुकाध्यक्ष गजेंद्र गुरव उपस्थित होते.

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले म्हणाले, ‘जीवनाच्या बाबतीतील महत्त्वाची आणि खडतर सेवा आरोग्य सेवक बजावत असतात. पण या आरोग्य सेवकांचा सन्मान होत नाही ही बाब खरी आहे. कोरोना नंतर या सेवेचे महत्व कळले आहे. या आरोग्यसेवकांचा केलेला सन्मान हा खूपच मोलाचा ठरणार आहे. यामुळे सर्व कर्मचारी रिचार्ज होणार आहेत. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करत असताना आपण काय करतोय हे आपणास सांगताही यायला हवे. प्रत्येक बालक आजार मुक्त असायला पाहिजे. साथरोगात आरोग्य सेवक काम करतात. अशावेळी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेची साथ मिळणे गरजेचे आहे.’

करे पाटील म्हणाले, ‘गावातील स्वयंघोषित नेतेमंडळी, अधिकारी, आरोग्य सेवकांना अडचणीत आणण्याचे काम करतात. त्यांना भांबावून सोडत असतात. तरीही आरोग्य सेवक निष्ठेने काम करत असतात. अशा आरोग्य सेवकाच्या निधनानंतर त्यांच्या नावाने आरोग्य सेवकांना सुरू केलेला पुरस्कार हा स्तुत आहे.’

गटविकास अधिकारी मनोज राऊत म्हणाले, ‘पूर्वीच्या काळी प्रशासनाच्या योजनांना प्रतिसाद चांगला मिळत. गरजू जास्त आणि सेवा देणारे कमी होते. त्यामुळे सेवा देणाऱ्यांना गरिबांबद्दल आत्मीयता होती. लाभार्थी जास्त अन् निधी कमी मिळाला तरी सर्व योजनांचे कार्यक्रम चांगल्या प्रकारे चालत. आता चित्र बदलत आहे. श्रीमंती वाढली तरी दारिद्र रेषेखालील लोकांची यादी ही कमी होत नाही. याचा परिणाम आरोग्यच्या निधीवर होताना दिसतो. हे नक्कीच चांगली बाब नाही.’
जगदीश कोष्टी यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा कोष्टी यांनी सूत्रसंचालन केले. संपत जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील गुन्हेगावकर, अनिल गुंजेगावकर, मयंक कोष्टी यांनी परिश्रम घेतले.

आशा क्लिनिक संकल्पना राबविणार

करमाळा तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील लोकांना मुल आजारी पडले तर करमाळा यावे लागते. प्रवास खर्च पाचशे रुपये करून करमाळ्यात आल्यावर मात्र डॉक्टर वाफ देतात. याचा खर्च केवळ तीस रुपये असतो. त्यामुळे अनेक पालक मुलांना दवाखान्यात आणण्यासाठी टाळतात. दिल्लीतील ‘मोहल्ला क्लिनिक’ च्या धर्तीवर करमाळा तालुक्यात आशा क्लिनिक ही संकल्पना राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दृष्टीने हालचाली सुरू झाली आहे. प्रशासन शिक्षणाकडून आरोग्याकडे वळत आहे. याची सुरुवात आता या कार्यक्रमाने होत आहे,’ अशी माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE