करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सुशीलकुमार शिंदे – जयवंतराव जगताप यांची भेट ; राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण

करमाळा समाचार

करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मंगळवारी सकाळी सोलापूर येथे जनवात्सल्य निवासस्थानी माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली . एकांतात तब्बल अर्धा तास झालेल्या भेटीचा तपशील मात्र गुलदस्त्यातच आहे. चर्चेवेळी खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या . या भेटीने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या असून लोकसभेतील विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या शिंदेंनी पक्षवाढीसाठी आपल्या मुळ काँग्रेसी जुन्या सहकाऱ्यांची मोट बांधणे सुरू केल्याचेच हे द्योतक आहे . शिंदेंच्या राजकीय जीवनाची सुरुवात झालेल्या करमाळा मतदारसंघातून जयवंतराव जगताप यांना ताकद देत पुन्हा काँग्रेस बळकटीचे त्यांचे धोरण आहे . शिंदे -जगताप यांच्या भेटीने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या असून माजी आ. जगताप काँग्रेसतर्फे विधानसभेच्या रिंगणात उतरणारअसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे .

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जगताप यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना समर्थन दिले होते . या निवडणुकीवेळी जगताप यांची शरद पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांनी भेट घेतली होती . यावेळी जगताप यांनी त्यांचा यथोचित सत्कार करत जनतेला सूचक संदेश दिला होता . जगताप यांचे वडील माजी आमदार नामदेवराव जगताप निष्ठावंत काँग्रेसी होते . पक्षसंघटनेच्या माध्यमातून त्यांची जिल्ह्यावर मजबूत पकड व कार्यकर्त्यांचे संघटीत जाळे होते . जयवंतराव जगताप यांनी १९९० ते१९९५ व२००४ ते२००९ दोन वेळा आमदार , तब्बल तीस वर्षे करमाळा बाजार समितीचे सभापती , राज्य बाजार समिती संघाचे संचालक ,प्रदीर्घ काळ सोलापूर डिसीसी बँकेचे संचालक व उपाध्यक्ष , आदिनाथ साखर कारखान्याचे चेअरमनपद भूषविले आहे . सहकार व शैक्षणिक क्षेत्रात ते कार्यरत असून करमाळा तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात जगताप यांचा प्रभावी व्यक्तिमत्वाचा , वक्तृत्त्वाचा मोठा दबदबा आहे . निष्ठावंतांची एकगठ्ठा मते हे आजही जगताप गटाचे बलस्थान असून जगतापांच्या भूमिकेवरच करमाळा विधानसभेचा निकाल अवलंबून आहे हि वस्तुस्थिती आहे . याविषयी जगताप यांना विचारले असता त्यांनी हि सदिच्छा भेट असल्याचे सांगितले.

politics

तसेच शिंदे साहेबांचे व माझे खूप जुने ऋणानुबंध व भावनिक नातेअसून स्थानिक राजकीय परिस्थितीमुळे जरी पक्षीय पातळीवर काही वेळा वेगळे निर्णय घेतले गेले असले तरी माझी त्यांच्यावरील श्रद्धा व त्यांचे माझेवरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही व होणारही नाही . भावनिकदृष्ट्या व वैचारिक दृष्टया माझी सुशिलकुमार शिंदे , शरद पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशीच नाळ असल्याचे जगताप यांनी सांगितले . या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे व जगताप यांची भेट फक्त सदिच्छा भेट नसून या मागे अनेक राजकीय गुपिते दडले असल्याची चर्चा आहे .काँग्रेसने नुकतेच २८८ विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत . त्यासाठी जगताप यांच्यासारख्या सक्षम उमेदवारांची नावे पुढे करून जास्तीत जास्त जागा पदरात पाडण्याचा काँग्रेसच्या रणनितीचा देखील हा एक भाग असू शकतो .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE