मोहितेंचा कट्टर समर्थक नेता आजही आबांच्या गटात ; दोन टीम नेमके गौडबंगाल काय ?
करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील राजकारणात एक नवी खिचडी पहायला मिळत आहे. समविचारी नेत्यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याऐवजी दोन वेगवेगळ्या टीम मैदानात उतरल्याचे दिसत आहे. त्यामुळे सदरच्या टीम या मतभेदातून तयार झालेल्या आहेत की नाराजी होऊ नये म्हणून तयार करण्यात आल्या आहेत हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. प्रथमदर्शनी तरी दोन्ही टीम खासदार मोहिते पाटील व विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या नावे विभागले गेले आहेत.

मागील आठवड्यात भाजपा व अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे युती होताना दिसून आली. त्यामध्ये बागल गट व शिंदे गट एकत्रित काम करताना दिसणार आहे. हा सुरुवातीला पहिला धक्का बसलेला दिसून आला होता. तर त्यानंतर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी निवडणुकांमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका घेत सर्व इच्छुक उमेदवारांना माघार घेण्यास सांगितले होते. हा दुसरा धक्का दिसला होता. तर आता विद्यमान आमदार नारायण पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील या दोघेही वेगवेगळी टीम घेऊन मैदानात उतरलेले दिसत आहेत.
मुळातच टीम निवडतानाही केमचे अजित तळेकर यांच्यासारखा मोहिते एकनिष्ठ व कट्टर समर्थक अद्यापही विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या उमेदवारांच्या यादीमध्ये असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोहिते पाटलांचा कट्टर समर्थक हा पाटलांच्या यादीत कसा ? म्हणून अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. तर विद्यमान आमदार हे राष्ट्रवादीचे असताना त्यांचेच पदाधिकारी हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभा असल्याचे दिसत आहेत. पण स्वतः आमदार मात्र तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून पाठीशी राहण्याचे पसंत करीत आहेत.

यामध्ये सत्ताधारी व वरिष्ठ पातळीवरून काही राजकीय हालचाली किंवा दबाव असल्याच्या चर्चाही आहेत. शिवाय निवडणुका झाल्यानंतर पाटील हे आपले उमेदवार सत्ताधारी टीम कडे जाऊ शकतात अशीही चर्चा रंगत आहे. तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी उभा करून मतांची विभागणी करण्याचा डाव ही यामध्ये असू शकतो. तसेच नाराज उमेदवारांनी गट व पक्ष सोडून विरोधी गटात जाऊ नये म्हणून ही खेळलेली नवी चाल ही असू शकते, असे वेगवेगळे तर्कवितर्क याच्या माध्यमातून लावले जात आहेत. पण खरी नेमकी परिस्थिती काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
नुकतेच माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण काही दिवसांपूर्वी ज्यांना मदत केली होती ते ते विसरले असल्याचे उघडपणे सांगितले. तर येणाऱ्या काळात आपण कोणतीही भूमिका विचारपूर्वक घेऊन योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ असे म्हणाले. शिवाय वरिष्ठ पातळीवरील सुरू असलेल्या राजकीय गोंधळाचाही करमाळा या ठिकाणी अडसर होऊ शकतो. याचीही आठवण करून दिली. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यातून वरिष्ठ पातळीवरील सत्ताधारी हे तालुक्याच्या राजकारणात ढवळाढवळ करीत असल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप व खासदार मोहिते पाटील यांनी खरोखरच आ.नारायण पाटील यांची साथ सोडली असली तर हा मोठा धक्का पाटील गटाला मानला जात आहे.

