एकही दानशुर देणगीदार मिळाला नाही याची खंत ; नॅशनल खेळाडुच्या पित्याची उव्दिग्न मनस्थिती
करमाळा समाचार – विशाल घोलप
अमरावती येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत १७ व १९ वर्षे वयोगटातील स्पर्धेमध्ये १७ वर्षे वयोगटात वैष्णवी पाटील हिने वैयक्तिक दोन सुवर्ण व एक ब्रांझ पदक मिळवले. ३० मीटर अंतरावरून खेळताना तिने ३६० पैकी ३१३ गुण मिळवत गोल्ड मेडल मिळवलं. तर चाळीस मीटर अंतरावर खेळत असताना तिला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यासह वेगवेगळ्या स्पर्धांसाठी तिचे नामांकन झालेल असून नॅशनल पातळीवर चमकदार अशी कामगिरी करणारी वैष्णवी पाटील एक गुणी खेळाडू म्हणून समोर येत आहे. ती सध्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत आहे.
वैष्णवी पाटील हिचे वडील एका खाजगी संस्थेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या व्यस्त वेळातून, आर्थिक परिस्थिती नसतानाही कुमार पाटील यांनी केवळ मुलगी उत्कृष्ट पद्धतीने खेळाडू म्हणुन पुढे येत आहे व तिची आवड धनुर्विद्या या खेळामध्ये असल्याकारणाने तिला प्रोत्साहन देण्यासाठी त्यामध्ये स्वतःहून लक्ष घालत आहे. परंतु धनुर्विद्या हा खेळ महागडा खेळ म्हणून ओळखला जातो. यासाठी लागणारे साहित्य लाखोंच्या घरात जाते. पण काटकसर करत आयुष्य काढणाऱ्या शिक्षक कुटुंबातील दांपत्यांने आजपर्यंत आपल्या मुलीसाठी या कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही.
सामान्य घरातील विशेष करून मुलींनी खेळाकडे लक्ष देऊन आपले करिअर घडवावे अशी मानसिकता कोणाचीच नसते. परंतु आपली हालाखीची परिस्थिती व आर्थिक कुवत नसतानाही पाटील दांपत्याने घेतलेला हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. परंतु यासाठी लागणारे साहित्य गोळा करण्यासाठी पाटील यांची दमछाक होताना दिसून येत आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक दानशूर व बड्या नेत्यांकडे विणवण्या केल्या चपल्या झिजवल्या परंतु आजपर्यंत एकानेही त्यांच्या बाजूने सहकार्याची भावना दाखवली नाही त्यामुळे ते हतबल झाले आहेत.
नॅशनल खेळाडू असतानाही जिल्हास्तरीवर व राज्यस्तरीवर असलेल्या शासकीय यंत्रणेमार्फत तरी त्या कुटुंबाला सहकार्य होणे अपेक्षित होते. परंतु आजतागायत कसलेही सहकार्य शासनामार्फत झालेले नाही. वैष्णवी पाटील ही सध्या राष्ट्रीय खेळाडू म्हणून उदय उदयास येत आहे. परंतु तिला धनुर्विद्यासाठी लागणारे साहित्य जवळपास चार ते पाच लाखांच्या घरात जात आहे. आतापर्यंत स्वतः जवळ असलेला पैसा पाटील दांपत्याने त्यात खर्चला आहे. त्याशिवाय आता जवळपास तीन लाखांपर्यंतची जुळवाजुळव केली आहे. अजूनही एक ते दीड लाख रुपये कमी पडत असून त्यासाठी दानशूर व्यक्तींकडे पदर पसरण्याचं काम पाटील दांपत्य करत आहे. परंतु अजूनही त्यात यश आले नाही.
अशा या गुणी नॅशनल खेळाडूला चालना मिळावी तिच्या माध्यमातून इतर मुलींना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. यासाठी एक चांगली खेळाडू पैशाअभावी मागे पडू नये म्हणून आर्थिक सहकार्याची अपेक्षा केली जात आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटत असेल की अशा मुलींना व खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे त्यांनी (9921592219 कुमार पाटील) या क्रमांकावर जशी जमेल तशी आर्थिक सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे.