काळे दाम्पत्याच्या अपघातानंतर नातेवाईक आक्रमक ; मृत शरीर ताब्यात घेण्यास नकार
करमाळा समाचार
रविवारी माढा तालुक्यातील नातेवाईकांची भेट घेऊन करमाळ्याच्या दिशेने येत असताना पाठीमागून भरधाव वेगात येत असलेल्या पिकअप गाडीने जोराची धडक दिल्यानंतर करमाळ्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पुष्पा काळे (वय 42) यांचा जागीच मृत्यू झाला तर मनोज काळे (वय 47) यांचा उपचाराला नेत असताना मृत्यू झाला आहे. यानंतर आता नातेवाईक आक्रमक झाले असून त्यांनी उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला भरपाई भेटल्याशिवाय मृत शरीर ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
मनोज काळे (गुरव) व पुष्पा काळे (गुरव) हे करमाळा येथील शनी मंदिर या ठिकाणी पुजारी म्हणून काम पाहत होते. त्यामुळे त्यांचे शहरात सर्वांसोबत चांगले संबंध होते. त्यांच्या जाण्याने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मनोज व पुष्पा यांच्यानंतर सर्व कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे आता काळे यांच्या नातेवाईकांनी संबंधित पिकअप चालकाच्या चुकीमुळे झालेल्या अपघाताला जबाबदार धरले आहे. त्याच्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी करू लागले आहेत.
करमाळा येथे रात्री उशिरा पुष्पा यांचे मृत शरीर आणण्यात आले होते. तर रात्री मनोज यांना उपचारासाठी बार्शी येथील दवाखान्यात नेण्यात आले होते. दवाखान्यात पोहोचल्यानंतर मनोज यांना मृत घोषित करण्यात आले. रात्री उशिरा मनोज यांचे मृत शरीर करमाळा येथे आणण्यात आले आहे. तर आता पुष्पा यांच्या माहेर कडील नातेवाईकही आता करमाळा दाखल झाले आहेत व त्यांच्यासह करमाळा येथील नातेवाईक नुकसान भरपाई साठी उपजिल्हा रुग्णालय येथे ठाण मांडून बसले आहेत.