दुख:द बातमी – युनियन बॅंकेचे कर्मचारी परिस (गोट्या) वादवणे यांचे निधन
करमाळा समाचार
शहरातील खडकपुरा येथील रहिवासी व सांगोला येथे युनियन बँक ऑफ इंडिया बँकेत कार्यरत असलेले परिश (गोट्या) रमेश वादवणे (वय ३३) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. परिस वादवणे हे अतिशय मनमिळावू व शून्यातून आपलं विश्व निर्माण करणारे एक गुणी युवक म्हणून समोर आले होते. अचानक त्यांच्या जाण्याने मोठी हानी झालेली दिसून येत आहे.

करमाळा शहरातील खंदकरोड येथील सामान्य कुटुंबातील परिस वाढवणे यांची करमाळा येथे युनियन बँक मध्ये कंत्राटी पद्धतीने शिपाई पदावर नेमणूक करण्यात आली होती. त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या कामातील कौशल्य दाखवत ग्राहकांसह बँकेतील कर्मचाऱ्यांवरही आपला प्रभाव टाकला होता. अतिशय मनमिळाऊ व कार्य तत्पर असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत होते. दरम्यानच्या काळात त्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया या ठिकाणी निघालेल्या जागा संदर्भात परीक्षा दिली व त्यात ते उत्तीर्ण झाले.

सुरुवातीला करमाळा तर नंतर सांगोला येथे त्यांना कामानिमित्त जावे लागले. तालुक्यातील प्रत्येक घटकातील लोकांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला योग्य मार्गदर्शन आणि सल्ला त्यांच्या वतीने मिळत असे. त्यांनी शिपाई पदापासून बॅंक अधिकारी पदापर्यंत जात असताना सर्वांशी जुळलेली नाळ कधीच तोडली नाही. आजही ते प्रत्येकाच्या संपर्कात राहत असत. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मित्रपरिवार व कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यावर आज दुपारी साडेबारा वाजता करमाळा येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.