करमाळाताज्या घडामोडीराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

घड्याळ नेमके कोणाचे ? करमाळ्यात वाढला संभ्रम ; अंतीम क्षणाला फैसला !

करमाळा समाचार – विशाल घोलप 

करमाळा तालुक्यातील राजकीय गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी कोणाच्या युत्या, कोणाच्या आघाड्या, कोणाचा कोणता पक्ष यावरून वाद सुरू असतानाच आता त्यात आणखी भर पडताना दिसत आहे. नुकतंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याबाबत बैठका झाल्या व जवळपास जिल्ह्यात राष्ट्रवादी एकत्र येऊन घड्याळ या चिन्हावर लढणार असल्याचे निश्चित झाले. पण करमाळ्यात मात्र कसे होताना दिसत नाही. त्यातही घड्याळ नेमके कोणाचे ? हा मोठा प्रश्न सध्या करमाळ्यात पडला आहे.

नगरपरिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावर माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी उमेदवार उभा ठाकले होते. तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मध्ये ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवडणुका लढवत भाजपासोबत युती करत उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना शिंदे यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. पण एबी फॉर्म वाटपच्या क्षणापर्यंत अद्यापही उमेदवार तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याचे दिसत आहे.

तर खासदार मोहिते पाटील यांनी करमाळा तालुक्यातील उमेदवारांना घड्याळ व तुतारी या दोन्ही चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितल्यामुळे संभ्रम अधिकच वाढला आहे. तर मागील दोन दिवसांपूर्वी मोहिते पाटील हे अजित पवारांच्या भेटीला गेल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे त्या भेटीत काय शिजलं आहे ते अद्याप गुलदस्त्यात आहे. पण माघारी आल्यानंतर मोहिते पाटील गटाच्या उमेदवारांनी घड्याळ चिन्हाचा फॉर्म भरणे हे एक प्रकारे माजी आमदार शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम व भीती निर्माण करणार चित्र आहे.

वरिष्ठ पातळीवरून दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर करमाळ्यातही एकत्र निवडणूक लढावी अशी अपेक्षा असताना असे मात्र घडलेले दिसून येत नाही. त्यामुळे वरिष्ठांकडून कोणता निर्णय घेण्यात आला आहे ते आज स्पष्ट होईल. आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवट दिवस असून माजी आमदार शिंदे व मोहिते पाटील दोन्ही गटांकडून घड्याळ चिन्हाचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्या नेत्याकडे एबी फॉर्म जातील यावर लक्ष लागून राहिले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE