असोसिएशन पंचाकडुन खेळाचा बट्ट्याबोळ ; मालकाला खुश करण्यासाठी विरोधात निर्णय ?
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील वेगवान गोलंदाज तसेच आक्रमक फलंदाज असलेल्या टेनिस क्रिकेटचा अष्टपैलू खेळाडू सुरज गुप्ता याच्या गोलंदाजीवर आक्षेप घेत जेऊर येथील सामन्यात सोलापूरच्या पंचांनी त्यास ब्यान करीत खुनशी वृत्ती दाखवल्याचे दिसून आले. यातून विशेष म्हणजे या सर्व प्रकाराचे चित्रीकरण झाले असून सदरचा गोलंदाज गोलंदाजी करताना सरळ हाताने गोलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे आता तालुक्यातून संबंधित पंचाविरोधात निषेध मोहीम राबवली जात आहे.
करमाळा येथील जेऊर परिसरात जेपीएल नामक एक लाख रुपये असलेले टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. सदरच्या स्पर्धेमध्ये करमाळा तालुक्यातील व परिसरातील गावांमधून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये संबंधित आयोजकांच्या संपर्कातील व आयोजन समिती मधील काही खेळाडूंचा संघ ही उतरल्याचे दिसून आले. संबंधित खेळाडू व आयोजकांना खुश करण्यासाठी सदरचा निर्णय हा सोलापूर येथील बुरला नामक पंचानी दिल्याचा आरोप शिवक्रांती संघाच्या वतीने करण्यात आला आहे.
ज्या गोलंदाजाला संबंधित पंचाने बंद केले तो गोलंदाज मागील सर्वसामान्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेला तसेच महाराष्ट्रातील इतर तालुक्यात व जिल्ह्यात उत्तम अशी कामगिरी करणारा गोलंदाज आहे. मोनू गुप्ता म्हणून नावाजलेला हा गोलंदाज तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या भागात खेळत असताना आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे चमकदार कामगिरी करतो. जर त्याची गोलंदाजी फेकी पद्धतीची असती तर त्यावर यापूर्वी इतर ठिकाणी बंदी घातली गेली असती. परंतु वैयक्तिक राग मनात धरून फक्त करमाळा तालुक्यात सदरचा खेळाडू तालुक्यातील गुणवान खेळाडू असतानाही अशा प्रकारचा आक्षेप घेऊन त्याचा खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुळातच असोशियनच्या नावाखाली तयार झालेली नावाखाली तयार झालेली पंचकमिटी व त्यामध्ये निवड झालेले पंच कशाच्या आधारावर निवडले जातात ते पंच पैसे घेऊन तर निर्णय देत नाहीत ना याची शहानिशा व एखाद्या खेळाडूवर अन्याय करत असतील तर न्याय कुठे मागायचा अशा प्रकारचे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. संबंधित पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आज झालेल्या सामन्यात पूर्ण निकाल बदललेला दिसून आला. अतिशय एकतर्फी अशी खेळी करत शिवक्रांती संघाने आयोजकांच्या निकटवर्ती असलेल्या खेळाडूंच्या संघाला पराभूत करून विजय मिळवला. मात्र दुसऱ्या संघासोबत खेळत असताना गोलंदाजावर आक्षेप घेतल्याने शिवक्रांती संघाने मैदान सोडले व संबंधित मालिकेचा निषेध केला.