करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

उजनी काठच्या शेतकऱ्यांना दिलासा देत तालुक्याचा पुढचा प्लॅन तयार – आ. संजयमामा शिंदे

करमाळा समाचार -संजय साखरे

यावर्षी उजनीची लाईट कपात होणार नसून शेतकऱ्यांनी चिंता करू नये. कुकडीच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रातील गावांसाठी उजनी कुकडी उपसा सिंचन योजना राबवून करमाळा तालुक्या च्या विकासाला गती देणार असल्याचे प्रतिपादन करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी हिंगणी तालुका करमाळा येथील जलजीवन मिशन योजनेच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी केले. सुमारे 66 लाख 47 हजार दीडशे रुपये खर्च करून उभा करण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेचा लोकार्पण सोहळा हिंगणी येथे संपन्न झाला. त्यावेळी आमदार शिंदे बोलत होते.

आमदारकीच्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. करमाळा तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला जातेगाव ते टेंभुर्णी रस्ता व पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणारा डिकसल् पुलाचा प्रश्न आपण अर्थमंत्री अजित दादांच्या माध्यमातून मार्गी लावला असल्याचेही त्यांनी सांगितले.

करमाळा तालुका कुकडी लाभक्षेत्रात सर्वात शेवटी येत असल्याने कुकडीचे पाणी आपल्याला मिळत नाही. त्यामुळे करमाळाच्या वाट्याला मिळणारे कुकडीचे पाणी उजनी त सोडून ते पाणी प्रस्तावित वाशिंबे व केतुर उपसा सिंचन योजनेद्वारे कुकडीच्या चारीत सोडून ते पाणी कुकडी लाभ क्षेत्रातील जिरायती शेतीला देण्याचे आपले नियोजन असून या योजनेला तत्वतः मंजुरी मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

तालुक्यातील विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी कात्रज, कोर्टी ,पांडे, कोळगाव येथे ऍडिशनल ट्रांसफार्मर बसविण्यात आले असून रायगाव आवाटी व राजुरी येथे नवीन सब स्टेशनची निर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी आवाटीचा लोकार्पण सोहळा पुढील पंधरा दिवसातच होईल असेही त्यांनी सांगितले. याशिवाय सौन्दे येथे नवीन 132 के व्ही सब स्टेशनचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. यामुळे तालुक्यातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल.

करमाळा तालुक्यातील ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला सावडी ते वेणेगाव फाटा या ७० किलोमीटर लांबीच्या रस्त्याला चालूच बजेटमध्ये तरतूद होणार असून यामुळे ग्रामीण विकासाला बळ मिळेल. यावर्षी उजनीची लाईट कपात होणार नसून शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी भगतवाडी व गुलमरवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार संजय मामा शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी अजित विघ्ने, राहुल सावंत, सूर्यकांत विलास, नितीन राजे भोसले, विवेक येवले,राजेंद्र बाबर यांची भाषणे झाली.

या कार्यक्रमाला अजित विघ्ने, अशोक पाटील, चंद्रहास निमगिरे, गोरख गुळवे ,सतीश शेळके, सूर्यकांत पाटील ,विलास पाटील ,बाळकृष्ण सोनवणे, राजेंद्र धांडे, उदय ढेरे, विवेक येवले ,दादासाहेब निकम, कात्रजचे सरपंच हंडाळ बापू, सुजित तात्या बागल, भाऊसाहेब शेळके,हनुमंत नवले, रा किरण फुंदे, किरण कवडे, नितीन राजे भोसले, डॉक्टर केवारे, गौरव झांजुर्णे,गौतम ढाने आदी उपस्तित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बबनराव जाधव साहेब यांनी केले तर आभार राजेंद्र बाबर यांनी मानले. सूत्रसंचालन नवले यांनी केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE