माजी आमदारांच्या घराशेजारीच रस्त्याला खड्डे पडुन तळ्यासारखे रुप ; प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी : करमाळा –
येथील दत्तमंदिर ते जिल्हा परिषद विश्रामगृह रस्त्याचे अत्यंत दुरावस्था झालेली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने या रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये एक फूट ते दीड फूट पाणी साचलेले आहे. अशा धोकादायक रस्त्यावरून महाविद्यालयाचे विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन महाविद्यालयाकडे येते आहेत. या रस्त्यावरून पोस्ट ऑफिस, टेलिफोन ऑफिस, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी, न्यायालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम खाते यासह माजी आमदार शामलताई बागल यांचे निवासस्थान इत्यादी महत्त्वाची कार्यालय असल्याने हजारो सर्वसामान्य नागरिक प्रशासकीय कामकाजासाठी दररोज या रस्ताने ये-जा करत असतात.

तसेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वस्तीगृहामध्ये कोविड सेंटर असल्याने या कोविड ग्रस्तांना ने- आण करण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो. त्यांनाही येण्या-जाण्यासाठी त्रास होत आहे. याबाबत महाविद्यालयाने जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार करमाळा, गटविकास अधिकारी करमाळा यांना रस्ता दुरुस्ती बाबतची मागणी केली आहे.
अनेक वेळा रस्ता दुरुस्ती बाबत पत्रव्यवहार करून व ही प्रत्यक्ष भेट घेतलेली असून जि. प. प्रशासन सदरचा रस्ता दुरुस्त करण्याबाबत टाळाटाळ करत आहे. तरी सदरचा रस्ता त्वरित दुरुस्त व दुहेरी न झाल्यास भविष्यकाळात महाविद्यालयातील विद्यार्थी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. तसेच आतापर्यंत एक जेष्ठ नागरिक व एक विद्यार्थ्याचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. तरी जि. प. प्रशासनाला कधी जाग येणार आहे असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांमधून विचारला जात आहे. तरी जि.प. प्रशासनाने याची त्वरीत दखल घेऊन सदरचा रस्ता त्वरित दुरुस्त व दुहेरी करावा ही मागणी आहे .
