करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पहिलीचे शिक्षण असलेल्या 76 व्या वर्षीय महिलेची सुशिक्षीत लोकांना लाजवणारी धडपड

करमाळा समाचार – विशाल घोलप 


“साहेब … ही माझ्या गावच्या लोकांची कामे आहेत ही करून द्या, हे सगळे गोरगरीब लोक आहेत त्यांना शासकीय कार्यालयात येणे जमत नाही.” हे शब्द आहेत वयाच्या ७६ व्या वर्षीही गोरगरिबांची शासकीय कामे करून देण्यासाठी धडपड करणाऱ्या कुंभारगाव येथील पार्वतीबाई शंकर सोनवणे यांचे. त्यांचे या वयातही कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

परवा हातात काठी आणि तुटलेल्या वायरच्या पिशवीत दोन-चार रेशनकार्ड घेऊन एक वृद्ध महिला अधिकाऱ्यांशी बोलत असल्याचे दिसली ती सांगत होती “सध्या ज्वारी काढण्याचे दिवस आहेत. लोक मजुरीला गेले आहेत. कुणाच्या रेशनकार्डात नाव कमी करायचे आहे, तर कुणाला धान्य मिळत नाही हे पाहुन न रहावता त्या महिलेशी चर्चा केली त्यातुन जे समोर आले ते सुशिक्षित लोकांना लाजवेल असेच काहीसे होते.

जिथे सुशिक्षित वर्ग तहसील परिसरात अडाणी व कमी शिकलेल्या लोकांकडून अर्ज भरून घेऊन पैसे घेताना दिसतो, तिथे केवळ पहिली शिकलेल्या वयोवृद्ध महिलेकडून लोकांची कामे करून दिली जात आहेत, हे अनेक तरुणांच्या तोंडावर चपराक असल्याचे चित्र दिसून येते. तहसील परिसरात सामान्य माणूस एखाद्या कामासाठी गेल्यानंतर त्याची कामे किती झटपट होतात याचा अनुभव प्रत्येकाला आहे. अशा परिस्थितीत सुशिक्षित तरुणांसाठी पार्वतीबाईंचे कार्य मोठा धडा देणारे आहे.

अनेकदा वयोवृद्ध लोक सततच्या हेलपाट्यांना वैतागून शासकीय कार्यालयात येणे टाळतात. मात्र परिस्थितीने या महिलेला एक संधी दिली आणि त्या संधीचे सोनं करून दाखवण्याचे काम पार्वतीबाईंनी केले. वयामुळे त्रास होतो, धडपड करावी लागते; तरीही त्या थांबत नाहीत. त्यांच्या या धडपडीमुळे प्रशासनही त्यांच्याकडे सहकार्याच्या भूमिकेतून पाहताना दिसते. त्यामुळे वयाच्या उत्तरार्धातही त्यांनी स्वतःची उपजीविका सुरू ठेवली आहेच, पण त्याचबरोबर अनेक सामान्य लोकांची कामेही मार्गी लागत आहेत. अशा या वृद्ध महिलेचे कार्य पाहता आजच्या तरुणांनी त्यांच्याकडून आदर्श घेण्याची गरज असल्याचे दिसून येते.

प्रशासनही सहकार्य करते …
मी फक्त पहिलीत शिकले. त्यानंतर शाळा सुटली. मला गोरगरिबांची कामे करण्याची आवड आहे. माझे वय झाले असले तरी मी कुंभारगावाहून धडपडत इथे येते. एसटी फुकट असल्याने फारसा खर्च लागत नाही. माझे वय आणि माझी धडपड पाहून साहेब लोकंही काम करून देतात. त्यामुळे मला खूप आनंद मिळतो. कामाच्या मोबदल्यात कोणी दहा-पाच रुपये दिले तर घेतो, नाही दिले तरी मला काही वाटत नाही.
पार्वती सोनवणे, कुंभारगाव.

 

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE