दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए – नगरसेवकाचा दरारा ; जनता बोंबलुन कंटाळली तरी झाले नव्हते काम
करमाळा समाचार

विषय छोटा का मोठा हा विषय नाही. पण मागील अनेक दिवसांपासून करमाळा शहरातील नव्याने झालेल्या रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची विनंती सामान्य नागरिकांकडून केले जात होती. परंतु त्या मागणीला प्रशासनाकडून केराची टोपली दिली जात होती. परंतु नुकतंच नवीन नगरसेवक नियुक्त्या झाल्या व त्यातील एका नगरसेवकांनी संबंधित विभागाला केवळ फोनवर विनंती केली. त्यावर लागलीच संबंधित प्रशासनाने गतिरोधक टाकून घेतले. विषय फक्त गतिरोधकचा नाही तर विषय असा आहे की “लकडी शिवाय मकडी वळत नाही” या उक्तीप्रमाणे प्रशासन काम करतं. पण त्यांना काम करून घेणारा माणूस पाहिजे असे दिसून येते.

करमाळा शहरातील देवीचा माळ रस्त्याला मोठ्या प्रमाणावर मोठा रस्ता झाला असून संबंधित रस्ता हा तीन ते चार पदरी झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. वेगवान गाड्या येजा करतात. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या शाहूनगर व इतर भागातील लोकांना रस्त्यावरून वाहतूक करीत असताना वेगवान गाड्यांचा सामना करावा लागत होता. आपल्या भागातून रस्त्यावर येत असताना किंवा रस्ता ओलांडत असताना वेगवान जाणारी गाडी अंगावर येण्याची भीती होती.
यासंदर्भात परिसरातील नागरिक , सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी बांधकाम विभागाला वेळोवेळी सूचना दिल्या व गतिरोधल घेण्याची मागणी केली. परंतु सामान्य लोकांच्या मागणीला उत्तर देतील ते प्रशासन कसले. शासकीय नोकरी म्हणून काम करत असताना त्यांना सामान्य जनतेचे काहीच घेणं देणं राहिलेलं दिसून येत नाही. त्यांच्या मागणीला केराची टोपली दिल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे वेळोवेळी त्या भागातील सूचना पत्र व्यवहार झाले तरी काम होत नव्हत. संबंधित रस्त्यावर वेळोवेळी अपघातही झाले. पण तरीही त्याचे डोळे उघडले नाहीत.

नंतर कालांतराने नगरपरिषद निवडणुका पार पडल्या व संबंधित भागातील नगरसेवकांनी धडाक्याने कामाला सुरुवात केली. नगरसेवक तुकाराम (पिलुभाऊ) इंदलकर व सचिन गायकवाड हे दोघेही वेगळ्या पक्षातून निवडून आले असले तरी त्यांच्या भागातील कामांचा धडाका त्यांनी लावला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी दोघेही अविरत काम करताना दिसून येतात. त्याचाच एक भाग म्हणून गतिरोधकाची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. यावेळी तुकाराम इंदलकर यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून वेळीच गतिरोधक बसवण्याची मागणी केली व त्या मागणीला तातडीने जागे होत प्रशासनाने तात्काळ गतिरोधक बसवलेही विशेष म्हणजे संबंधित काम हे केवळ दोन ते तीन दिवसात पूर्ण झाले.
मग प्रश्न हा उरतो की इतक्या दिवस नागरिक मागणी करत होते. सामाजिक कार्यकर्ते सांगत होते. पत्रकार बातम्या लावत होते. तरीही हे प्रशासन जागे होत नव्हते. मग केवळ नगरसेवकाच्या एका फोनवर काम कसे झाले ? याचाच अर्थ “लकडी शिवाय मकडी वळत नसते” असे दिसून येते अशा काम चुकार व सामान्य नागरिकांसाठी सेवा करण्यासाठी रुजु झालेल्या परंतु त्याच सामान्य नागरिकांना दुर्लक्षित करणाऱ्या अशा मुजोर अधिकाऱ्यांना यासारखेच नगरसेवक गरजेचे होते असे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाने अशा पद्धतीने काम करून जनतेची सेवा करणे गरजेचे आहे. यातून पुन्हा एकदा एकच सांगावे लागेल की दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये.

