करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

यंदा होणार उसाची पळवा पळवी बारामती ॲग्रो आणि अंबालिका नंतर आता दौंड शुगरची एन्ट्री

करमाळा समाचार – संजय साखरे


यावर्षी लांबलेला पाऊस आणि उजनी बॅक वॉटर परिसरात फळबागांचे वाढलेले क्षेत्र याचा मोठा परिणाम ऊस उत्पादनावर झाला असून उसाचे उत्पादन घटले आहे .त्यामुळे यावर्षी साखर कारखान्यांना ऊस मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा करावी लागणार आहे.

शेजारील पुणे जिल्ह्यातील बारामती अग्रो आणि नगर जिल्ह्यातील अंबालिका शुगर या साखर कारखान्यांना हमखास ऊस पुरवठा करणारा भाग म्हणून करमाळा तालुक्याचा पश्चिम भाग ओळखला जातो. परंतु अलीकडे या भागातील जिंती येथे दौंड शुगर या साखर कारखान्याने आपले विभागीय कार्यालय सुरू केले असून त्यांचे कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उसाची नोंदणी करीत आहेत.

दौंड शुगर चा ऊस दर हा अंबालिका व बारामती ऍग्रो यांच्या पेक्षा जास्त असतो. त्यामुळे यंदा या कारखान्यांमध्ये ऊस मिळवण्यासाठी स्पर्धा होणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र अच्छे दिन येणार आहेत. गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाला अद्याप पर्यंत बारामती ॲग्रोने प्रति टन २७००, अंबालिका शुगरने प्रति टन २८६७ रुपये तर दौंड शुगरने २८०० रुपये दर दिला आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

करमाळा कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०२३/२४ च्या गाळप हंगामासाठी करमाळा तालुक्यात आडसाली उसाचे ६१७८ हेक्टर, पूर्व हंगामी उसाचे १०१९९ हेक्टर, सुरू उसाचे २६५४ हेक्टर तर खोडवा उसाचे २२९५० हेक्टर अशी एकूण ४१९८१हेक्टर उसाची नोंद झाली आहे.

करमाळा तालुक्यातील सर्वच साखर कारखाने ऊस दराबाबत शेजारील तालुक्यातील कारखान्याच्या तुलनेत खूपच मागे असल्याने तालुक्यातील बहुतांशी शेतकरी हे बाहेरील कारखान्यास ऊस देण्यास प्राधान्य देतात. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लिमिटेड पिंपळनेर, पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर, सहकार महर्षी अकलूज या सहकारी साखर कारखान्याबरोबरच अंबालिका शुगर बारामती अग्रो व दौंड शुगर या खाजगी साखर कारखान्यांना तालुक्यातील ऊस जातो.

यावर्षी उसाचे क्षेत्र कमी व पाऊस लांबलेला असल्याने शेतकऱ्यांनी उसाला कमी प्रमाणात रासायनिक खत टाकले आहे .रासायनिक खतांमध्ये फक्त युरियाचाच वापर केल्यामुळे ऊसाला कमी रिकवरी लागते. यामुळे याचा परिणाम साखर उताऱ्यावर होतो. एकंदरीतच उसाचे क्षेत्र कमी व साखर उताराही कमी या दुहेरी आव्हानांचा मुकाबला साखर कारखान्यांना करावा लागणार आहे.

साखर कारखाने चालू होण्यास अद्याप विलंब असला तरी कारखान्याचे कर्मचारी आत्ताच आडसाली उसाची प्लॉट पाहणी करीत आहेत. ऊसतोड करणाऱ्या टोळ्यांचे आगमन हळूहळू होऊ लागले आहे .यंदा साखर हंगाम जेमतेम १०० ते १२० दिवस चालणार असण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

चालू वर्षीच्या गाळप हंगामासाठी आमच्याकडे करमाळा तालुक्यातील ६४४ हेक्टर उसाची नोंद झाली आहे. तर तालुक्यातील एकूण ६० ऊस वाहतूकदारांनी आमच्या कारखान्याशी ऊस तोडणी वाहतूक करार केलेले आहेत.
धनंजय काटकर, ॲग्री ओव्हरसीयर, दौंड शुगर जिंती विभागीय कार्यालय.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE