पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज ; कांदा उत्पादक धास्तावला
केत्तूर (अभय माने)
परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गुलाबी थंडीची चाहूल लागली असतानाच पुन्हा एकदा ढगांचा गडगडाट, हवामानातील बदल,आणि रिमझिम पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाची स्थिती कार्यरत झाली आहे.या पार्श्वभूमीवर वादळी वारे व मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.त्यानुसार आज गुरुवार (ता. 31 ) रोजी 4 वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि वारे चालू झाले होते व कोणत्याही क्षणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे.जर मोठा पाऊस झाला तर कांद्यास दर वाढले असताना अचानकपणे बदलणाऱ्या वातावरणाचा फटका कांदा पिकाला बसणार आहे.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतातुर होऊन धास्तावला आहे.जर पाऊस झाला तर रब्बी हंगामातील पेरण्याही लांबीवर पडणार आहेत.तर साखर हंगामही अजून चालू झाला नाही.तो केव्हा चालू होणार ? याची ऊस उत्पादक शेतकरी वाट पाहत आहेत.
पहाटे व रात्री सुरू झालेली गुलाबी थंडी अचानकपणे गायब झाली आहे त्यामुळे पंख्याची घरघर चालू करावी लागत आहे.ऋतूबदलाचा परिणाम मानवी आरोग्यावर मात्र होऊ लागला आहे.ऑक्टोबर संपत असताना शेवटच्या टप्प्यात ऑक्टोबर हिट चा तडाखा अजूनही जाणवत आहे.