करमाळासोलापूर जिल्हा

आरक्षण जाहीर झाल्यानंतर दिग्गजांना धक्का ; तीनही सभापती रिंगणाबाहेर जाण्याची शक्यता

प्रतिनिधी | करमाळा


पंचायत समितीच्या झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये विद्यमान सदस्यांना हादरे बसवणारे आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये मागील पंचवार्षिक मध्ये एकाच पक्षातील तीन सभापतींना संधी मिळाली होती. परंतु आरक्षण मुळे एकालाही उभा राहण्याची संधीही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्या तिघांनाही एक तर महिलांना संधी द्यावी लागेल किंवा वेगळ्या गणात उभे राहावे लागेल. सभापतीसह इतर काही विद्यमान सदस्यांनाही आपल्या जागा गमवाव्या लागत आहेत. तर काही ठिकाणी आरक्षण उठल्याने आनंद तर आरक्षण पडल्याने तुल्यबळांना धक्का बसला आहे.

पंचायत समितीच्या आरक्षण सोडती गुरुवारी सकाळी ११ वाजता पंचायत समिती हॉलमध्ये पार पडली यावेळी १२ जागांसाठी ही सोडत करण्यात आली. इयत्ता तिसरीचा विद्यार्थी वेदांत घुगे याच्या हस्ती चिठ्ठ्या काढुन आरक्षण जाहीर करण्यात आले. १२ पैकी दोन अनुसुचित जाती व तीन नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर १२ पैकी सहा महिलांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, तहसिलदार समीर माने, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्यासह देवानंद बागल, संतोष वारे, अशोक सरडे, राजू कांबळे, उदय ढेरे, चंद्रकांत सरडे, नरेद्र ठाकुर, अंगद देवकते आदिसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी सभापती शेखर गाडे यांचा गण मागील वेळी अनुसूचित जातीसाठी राखीव होता पण यंदा ना. मा. प्र. महिला आरक्षण पडले आहे. माजी सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्या गणातही नामाप्र महिला राखीव आल्याने त्यांचीही संधी हुकली तर माजी सभापती अतुल पाटील यांचा गण सध्या नव्या गणात विलीन होऊ त्याठिकाणी नामाप्र आरक्षण पडल्याने त्या तीनही सभापतींची संधी हुकली असल्याचे दिसुन येते. शिवाय पांडे गणात ॲड. राहुल सावंत हे विद्यमान सदस्य होते. पण यंदा तिथे खुल्या प्रवर्गातील महिलेला आरक्षण पडल्याने त्यांना सदर ठिकाणी उभे राहता येणार नाही.

चिखलठाण येथे सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने विद्यमान सदस्य दत्तात्रय सरडे यांच्या अडचणी तर वाढल्याच आहेत पण तुल्यबळ असे शिंदे गटाचे चंद्रकांत सरडे यांचा भ्रमनिरास झाला आहे. उमरड येथे शिंदे गटाचे बदे परिवारातील नेते आरक्षणाकडे डोळे लाऊन होते त्यांनाही अनुसूचित आरक्षण पडल्याने उभा राहता येणार नाही. तर दुसरीकडे जेऊर येथे नामाप्र आरक्षण असल्याने माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथीराज पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. तसेच साडे सारख्या गावात वजन असणारे शिंदे गटाचे दत्तात्रय जाधव यांना मात्र सर्वसाधारण जागा असल्याने त्या भागात त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. मागील वेळी दत्तात्रय जाधव यांच्या पत्नी सदस्य होत्या.

रावगाव – सर्वसाधारण, पांडे- सर्वसाधारण (महिला ), हिसरे – सर्वसाधारण, वीट – ना.मा.प्र. (महिला ), कोर्टी – सर्वसाधारण (महिला ), केत्तुर- सर्वसाधारण, चिखलठाण – सर्वसाधारण (महिला ), उमरड – अनुसुचित जाती (महिला), जेऊर – ना. मा. प्र., वांगी – अनुसुचित जाती, साडे – सर्वसाधारण, केम – ना. मा. प्र. (महिला ).

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE