धरणासाठी आम्ही त्याग केलाय मग पाणी कमी असताना सोडण्याचा घाट कशाला ?
करमाळा समाचार -संजय साखरे
सीना कोळगाव प्रकल्पामध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे व पाणी पातळी डेड स्टॉक मध्ये आहे. त्यामुळे वारीच्या नावाखाली सीना- कोळगाव धरणातून खाली पाणी सोडू नये अशी मागणी सीना कोळगाव धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष सतीश नीळ पाटील यांनी कार्यकारी अभियंता धाराशिव पाटबंधारे विभाग, धाराशिव -१ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, आम्ही धरणग्रस्त बांधवांनी आमची घरे, दारे, जमीन जुमला सर्वकाही धरणासाठी देऊन त्याग केला आहे. यावर्षी अजूनही पाऊस पडला नाही. म्हणून आमची उभी पिके अगोदरच जळून गेली आहेत. पाणी पातळी खाली गेल्यामुळे आम्हाला वारंवार केबल, पाईप वाढवाव्या लागत आहेत. तोच खर्च आम्हाला न झेपणारा झाला आहे. करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण, हिवरे, हिसरे ,कोळगाव, निमगाव, आवाटी व परंडा तालुक्यातील डोंजा, कवडगाव परिसरातील सर्व शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आले आहेत.

त्यामुळे आपण आमचा अंत पाहू नये व विनाकारण कोणीतरी वारीच्या नावाखाली पाणी मागत असेल तर ते आम्ही धरणग्रस्त शेतकरी अजिबात सहन करणार नाही. जर या वारीच्या नावाखाली पाणी सोडले तर धरणग्रस्त संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असाल असेही त्यांनी म्हटले आहे.
या निवेदनाच्या प्रती त्यांनी कार्यकारी अभियंता सीना कोळगाव प्रकल्प विभाग, माननीय पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन परांडा व माननीय पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन करमाळा यांना पाठवल्या आहेत.