करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

उद्योजकांना कर्ज मार्गदर्शन व एमआयडीसीतील प्रलंबित प्रश्न सोडविणार – सामंत

करमाळा | प्रतिनिधी

करमाळा शहरालगतच्या 48 हेक्टर एमआयडीसी क्षेत्रात केंद्र सरकारच्या प्रस्तावित कांदा प्रक्रिया प्रकल्पासाठी 50 एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, करमाळ्यात ‘गाव तिथे उद्योजक’ मेळावा आयोजित करून उद्योजकांना प्लॉट, कर्ज व उद्योग उभारणीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन करमाळा एमआयडीसीच्या विकासासाठी विविध पर्याय व प्रलंबित प्रश्न मांडले.

यावेळी केंद्र सरकारच्या नवीन कांदा प्रक्रिया प्रकल्पासाठी नाफेडला 50 एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे शहर व तालुक्यातील सुमारे दोन ते तीन हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसेच शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल, असे चिवटे यांनी सांगितले.
याशिवाय एमआयडीसी परिसरातील नव्याने तयार झालेल्या विहिरीतून उद्योजकांना तातडीने पाणी जोडणी द्यावी, उर्वरित प्लॉटचे वाटप वेगाने करावे, लहान प्लॉट वाटपातील प्रशासकीय अडचणी दूर कराव्यात तसेच प्लॉटधारक उद्योजकांना बँकांकडून कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात, अशा मागण्याही त्यांनी मांडल्या.

यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वतः करमाळ्यात येऊन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, मुंबई आणि उद्योग मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘गाव तिथे उद्योजक’ मेळावा आयोजित केला जाईल. या मेळाव्यात उद्योजकांना मार्गदर्शन करून एमआयडीसीतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन दिले.

या भेटीवेळी शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख अण्णासाहेब घाडगे (झरे), उपतालुकाप्रमुख बाळासाहेब वाघ, वीट दूध संघाचे संचालक व उपतालुकाप्रमुख प्रशांत राजे भोसले, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख दीपक पाटणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE