मुंढेंनी नाक दाबले की दूध उत्पादकांचा गळा दाबला जातोय ! ; अधिकृत आदेशाशिवाय दूध नाकारण्याचा अधिकार आहे का?
करमाळा समाचार | प्रतिनिधी

एकीकडे तुकाराम मुंढें यांनी भेसळी वरून दूध संघांचे नाक दाबलेले असताना दूध संकलन करणारे केंद्र इकडे शेतकऱ्यांचा गळा दाबत आहेत काय असा संशय व्यक्त होत आहे. ” 3.2/8.3 पेक्षा कमी गुणवत्तेचे दूध स्वीकारले जाणार नाही,” अशी सूचना काही दूध संकलन केंद्रांकडून उत्पादकांना देण्यात येत आहे. मात्र या निर्णयामागे संबंधित दूध संघ किंवा सक्षम प्राधिकरणाचा अधिकृत लेखी आदेश आहे का, असा प्रश्न दूध उत्पादकांकडून उपस्थित केला जात आहे.

दूध उत्पादकांचे म्हणणे आहे की, कोणताही लेखी आदेश किंवा पूर्वसूचना न देता अचानक अशा प्रकारचा नियम लागू केल्यास अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. पावसाळ्यात जनावरांच्या चाऱ्यातील बदलामुळे दूधातील फॅट व एसएनएफमध्ये चढ-उतार होणे ही सामान्य बाब असल्याचेही काही उत्पादकांचे मत आहे.
कायद्याच्या दृष्टीने, जर दूध संघ, सहकारी संस्था किंवा संबंधित कंपनीकडून अधिकृत आदेश, उपनियम किंवा करारातील अटी नसतील, तर केवळ संकलन केंद्राने स्वतःहून दूध स्वीकारण्यास नकार देणे वादाचा विषय ठरू शकतो. अशा परिस्थितीत उत्पादकांना संबंधित दूध संघ, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी किंवा सहकार विभागाकडे लेखी तक्रार करण्याचा अधिकार आहे.

दरम्यान, संबंधित दूध संकलन केंद्राने हा निर्णय कोणत्या आदेशाच्या आधारे घेतला आहे, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्याची मागणी दूध उत्पादकांकडून केली जात आहे. अधिकृत आदेश असल्यास तो सार्वजनिक करावा, अशीही मागणी होत आहे.

