३२ वर्षापुर्वी पालखीचा मार्ग होता वेगळा ; आज करमाळ्यात दाखल होणार श्री संत निवृत्तीमहाराज पालखी
करमाळा समाचार
श्री संत निवृत्ती महाराज पालखी रावगाव येथे प्रवेश व मुक्काम झाल्यानंतर सदरची पालखी ही करमाळा शहरात येते. त्या ठिकाणी राशीन पेठ तरुण मंडळाच्या वतीने त्यांचा पाहुणचार केला जातो. पूर्वी करमाळा शहरातून सदर पालखी जात नसे पण खराब रस्त्यामुळे करमाळा शहरातून पालखी जाऊ लागली. १९९२ पासून शहराला पालखीचे दर्शन करता येऊ लागले, तत्कालीन नगराध्यक्ष स्व.गिरधरदास देवी व चिमणलाल देवी यांच्याकडे पालखीची पंचकमिटी आली व त्यांनी हे नियोजन राशीन पेठ तरुण मंडळाकडे दिले.
पूर्वी सदरची पालखी ही रावगाव येथे आल्यानंतर वीट व झरे या मार्गे पंढरपूरला मार्गस्थ होत होती. पण रावगाव ते झरे हा रस्ता त्यावेळी (१९९२ मध्ये) खराब असल्यामुळे पालखी सोबत असलेल्या बैलगाड्यांचे नुकसान होत होते. त्यामुळे पालखी रावगाव ते करमाळा आणण्याचे ठरवले. सुरुवातीला पालखीमध्ये तीन ते चार हजार वारकरी असत आता तीच संख्या ४० ते ५० हजारापर्यंत जाऊन पोहोचली आहे. राशीनपेठ तरुण मंडळ संपूर्ण शहराला सोबत घेऊन सदर दिंडीचे स्वागत करते. ज्याला जमेल तशी आर्थीक व इतर सहकार्य करतो.
सर्वात मोठी दिंडी असल्याने शहरासह सर्वांनाच या दिंडीच्या आगमनाची आतुरता असते. दहा दिवसांपासून याचे नियोजन सुरू होते. यामध्ये राशीन पेठ तरुण सेवा मंडळातील सर्व जेष्ठ मंडळी तसेच तरुण मंडळी व करमाळा शहरातील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने हा पालखी सोहळा पार पडतो. करमाळ्यातील नागोबा मंदिरापासून श्री संत निवृत्ती महाराजांची पालखीचे स्वागत केले जाते व तिथूनच सुभाष चौक येथे पालखी दर्शनासाठी ठेवण्यात येते व वारकरी व भक्तांसाठी चौकाच्या चारही बाजूस जेवणाची व्यवस्था केली जाते.
राशीनपेठ तरुण मंडळाकडे सदरची जबाबदारी असली तरीही आसपासचे तरुण मंडळे तसेच गावातून भक्त मंडळी व युवा वर्ग या ठिकाणी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवतात. त्यामुळे एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या लोकांना सेवा देण्यात सोपे जाते. राशीन पेठ, दत्तपेठ, मेन रोड, व्यापरी मंडळ व शहरातील इतर तरुण मंडळ व युवकांसह जेष्ठ मंडळी ही तेवढ्याच उत्साहात काम करताना दिसतात.
– सोमनाथ चिवटे, जेष्ठ सदस्य, राशीन पेठ, करमाळा