करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अखेर ‘ती’ मुलगी मिळुन आली आणि आले खरे कारण समोर ; मुलीचे प्रेम काय असते जगाला कळले

करमाळा समाचार – विशाल घोलप

बापाचा अपघाती मृत्यू झाला…
ती बाहेरगावी होती तीला अचानक माहीती मिळाली ती घराकडे आली. तीने पाहिले आपला लाड करणारा बाप निपचित पडुन आहे. अपघातामुळे चेहरा ओळखु येत नाही. ती बाप गेलाय हे मान्यच करु शकत नव्हती.

घरात रडण्याचा आवाज थांबला, पण मुलीच्या मनातला आवाज मात्र वाढत गेला. ती वडिलांच्या प्रेमात होती— नात्यातल्या प्रेमात, आधारात, सावलीत.

लोक म्हणाले,
“तो गेला आता, विसर त्याला.”
पण ती कशी विसरेल?
ज्याच्या बोटाला धरून तिने चालायला शिकलं,
ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तिने जग पाहिलं,
तो अचानक नसलेला कसा मानायचा?

एक दिवस ती निघाली…
कोणाला काही न सांगता.
हातात काही नव्हतं—
फक्त आठवणी होत्या.
ती रस्त्यांवर वडिलांना शोधत होती.
प्रत्येक वयस्क माणसात तिला तेच दिसत होते,
प्रत्येक हाकेत त्यांचाच आवाज वाटत होता.

लोकांनी तिला वेडी म्हटलं.
पण तिला माहीत होतं—
वेड नव्हतं ते, प्रेम होतं.
शेवटी ती थकून बसली.
डोळे मिटले… आणि अचानक जाणवलं—
वडील कुठे गेलेच नव्हते.
ते तिच्या श्वासात होते,
तिच्या धडधडीत होते,
तिच्या प्रत्येक निर्णयामागे उभे होते.

ती उठली…
आता शोध थांबला होता.
कारण तिला कळलं होतं—
वडील मरत नाहीत,
ते फक्त मुलीच्या मनात राहायला जातात.

हे कोणते रचलेले कथानक नाही तर खरी घडलेली घटना आहे. करमाळा तालुक्यातील उजनीकाठच्या उंदरगावात मागील तीन वर्षापुर्वी एका अपघातात सानिकाचे वडील गेले. त्यावेळी सानिका ही शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी शिकायला होती. तीला घरी बोलवण्यात आले तीने घरी आल्यानंतर जे पाहिले त्याने तीच्या पायाखालची जमीन सरकली होती. ज्याने आयुष्यात कधीच कोणती गोष्ट कमी पडु दिली नाही. स्वतः फाटका राहिला पण मुलीली काही कमी पडुन दिले नाही. मोठा आधार असलेला बापच सोडुन गेला हा मोठा धक्का होता.

तेव्हा पासुन तीला मन खात होते. तीला वाटत होते आपले बाबा गेलेच नाहीत ते कुठेतरी हरवले आहेत. अखेर तीन वर्षानी वडीलांचा स्मृतीदिन आटोपुन सानिकाने वडीलांच्या शोधात बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तीने घरीच मोबाईलचे सीम बाजुला काढले व चुलत्यांसोबत बस स्थानकावर आली. चुलत्याने तीला गाडीत बसवले व पोहचल्यावर फोन करण्यास सांगितले. तिला गाडीत बसवली खरी पण ती सायंकाळचे सहा वाजले तरी पोचलीच नाही. त्यामुळे घरात सर्वत्र घबराट पसरली व तिचा शोध घेण्यास सुरुवात झाली.

मुलीचे वय जवळपास 18 वर्षे पूर्ण असल्याने तिची काळजी वाटू लागली. मुळातच आजकाल परिस्थिती एवढी बदलली आहे की एखादी मुलगी वयात आल्यानंतर जर मिळून येत नसले तर समाज समजतो की तिने काहीतरी वेगळा निर्णय घेतला व कुटुंबीयांना सोडून ती गेली असावी. पण हे प्रकरण वेगळेच होते. ज्यावेळी घरच्यांना खात्री पटली की ती मिळुन येत नाही. त्यावेळी त्यांनी खचून न जाता तिचा शोध घेण्याचा विचार केला व सर्व हकीकत गावकऱ्यांना सांगितली. गावकऱ्यांनाही परिस्थिती माहीत असल्याने संपूर्ण गाव त्या मुलीच्या शोधात बाहेर पडले.

मुलीने बापाचा शोध घ्यायचं ठरवलं होतं. मुलगी बारामती हून वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत मुक्कामाला एका खात्याच्या झाडांमध्ये जाऊन बसलेली होती. तब्बल दोन दिवस त्या ठिकाणी तिने मुक्कामही केला येवढ्या काकडणाऱ्या थंडीत कधीही एकटी बाहेर न पडलेली मुलगी दिवसरात्र एकटी फिरत होती. एका निवृत्त अधिकाऱ्याने ती दिसली तिला पाणीही पाजले. ज्यावेळी गावकरी तिचा शोध घेत होते समाज माध्यमातून तिची माहिती पसरवत होते ती माहिती पाहिल्यानंतर संबंधित अधिकारी हा त्या लोकांपर्यंत पोहोचला. त्यांनी तिच्याबद्दल माहिती दिली. यावरून गावकऱ्यांचा विश्वास पटला व त्यांनी शोध मोहिमेचा वेग वाढवला.

विशेष म्हणजे यावेळी संबंधित अधिकारी व परिसरातील गावातील लोकही या मुलीच्या शोधासाठी पुढे आले. आपले गावकरी आजही त्यांचा नाम उल्लेख करतात. अशा पद्धतीने एका मुलीच्या बापावर असलेल्या प्रेमासाठी तिने घर सोडलेले माहीत झाल्यानंतर सर्व परिसरात हळहळ होत होती.

गावोगावी जाण्यासाठी सुरुवातीला उंदरगावातुन दोन गाड्या निघाल्या होत्या. कालांतराने ठिकठिकाणी मुक्काम घडत होता. गावाकडून गाड्या वाढत होत्या गावकरी येत होते. मुलीचा शोध घेणाऱ्या गावकऱ्यांना गावातूनच जेवणाची व्यवस्था केली जात होती. मुक्कामाच्या ठिकाणी जेवण खान पोचवले जात होते. मुलगी कोणाची आणि तिचा आपला काय संबंध असा कोणताही विचार न करता प्रत्येकाने आपली मुलगी , बहीण घरातून गेली असल्याप्रमाणे तिचा शोध घेण्याचे काम सुरू होते. गावोगावी गेल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी एकटीच दिसत होती. त्यामुळे खात्री पटली होती की तिने कोणतेही चुकीचे पाऊल उचलले नव्हते ती फक्त वडिलांच्या शोधात होती.

अखेर गावोगावी तिचा शोध घेण्यात येत होता. ती ही रोज वेगवेगळ्या गावांना जाऊन आपल्या वडिलांचा शोध घेत होती. पुणे जिल्हा, नगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर अशा वेगवेगळ्या जिल्ह्याची टेहाळणी करत मुलगी पुन्हा एकदा बारामती येथे येऊन पोहोचली. यावेळी तिला जाणवली की घरचे तिचा शोध घेत असतील व आपल्या या प्रवासातून आपण वडिलांना शोधण्यासाठी बाहेर पडलो असलो तरी वडील कुठेच गेले नाहीत आजही आपल्या पाठीशी व मनात असून ते कायम आधार म्हणून आपल्या सोबत राहणार आहेत. त्यामुळे तिने आपला वडिलांच्या शोधाचा प्रवास थांबवला व चुलत्यांना संपर्क साधला. सर्व गावकरी व कुटुंबीयांनी सुटके चा निश्वास सोडला व तिची भेट घेतली. तिच्या भेटीने गावकरी व कुटुंबीय सुखावले.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE