करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

एक तास वाढवून तीन तास वीज; शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसल्याची भावना

करमाळा समाचार


करमाळा तालुक्यात कृषी वीजपुरवठ्यात केवळ एक तासाची वाढ करून तो तीन तासांपर्यंत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा निर्णय शेतकऱ्यांसाठी पुरेसा नसल्याची भावना व्यक्त होत असून, “भीक दिल्यासारखे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले” अशा तीव्र शब्दांत अनेक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

सध्या पावसाळा सुरू असला तरी अपेक्षित पाऊस झालेला नाही. अनेक भागांतील पिकांना तातडीने पाण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत केवळ तीन तासांचा वीजपुरवठा करून शेतीचे नियोजन करणे अशक्य असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उभी पिके वाचविण्यासाठी सलग आणि पुरेसा वीजपुरवठा आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, उजनी जलाशय परिसरातील वीजपुरवठ्यावर निर्बंध घालण्यामागे प्रशासनाने नियमांचे कारण दिले असले, तरी शेजारील काही तालुके व जिल्ह्यांमध्ये तुलनेने अधिक तास वीजपुरवठा होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यावरच कठोर निकष लागू केले जात आहेत का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, बैठका, निवेदने आणि आंदोलनांपेक्षा तातडीने निर्णय घेऊन वीजपुरवठा वाढविण्याची गरज आहे. कारण उशीर झाल्यास उभी पिके हातची जाण्याची भीती आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्रितपणे त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

वीजपुरवठ्यात एक तासाची वाढ झाली असली, तरी ती अपुरी असल्याने शेतकऱ्यांमधील असंतोष कायम आहे. आता पुढील निर्णयाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE