देवळाली पॅटर्न चा तालुक्यातील युवकांनी आदर्श घ्यावा ; तहसीलदार स्वतः सहभागी होणार
करमाळा समाचार

देवळाली गावातील ग्रामस्थ उत्स्फूर्त पणे एकत्र येत आपला गाव आदर्श बनवायचा ठरवून दर रविवारी दोन तास श्रमदान करत आहेत, त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड व तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी विशेष कौतुक केले आहे. विशेष म्हणजे उपक्रम इतका भावला की स्वतः तहसीलदार सहभागी होणार आहेत.

गावातील ग्रामस्थ, शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक, मजूर, पत्रकार असे सर्वच स्तरातील ग्रामस्थ गेले तेरा रविवार एकत्र येऊन तीन ते चार तास श्रमदान करत गाव झाडणे, गावातील कचरा हटवणे, काटेरी झुडपे काढणे स्मशानभूमी स्वच्छता, वृक्षारोपण तसेच गावाचे सुशोभीकरण करत आहेत. दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असून तीस ते चाळीस जण एकत्र येऊन या कामाला हातभर लावत आहेत.
राजकीय तसेच संघटनात्मक भूमिका सोडून ग्रामदैवताच्या साक्षीने निव्वळ देवळालीकर म्हणून एकत्र येत आपल्या गावाला आदर्श बनविण्याचा चंग या गावकऱ्यांनी बांधला आहे. पुरंदर तालुक्यातील आदर्श गाव “आडाची वाडी “ येथे स्वखर्चाने अभ्यास दौरा देखील या सर्वानी आयोजित केला होता.

अधिकाऱ्यांनी दर्शविली संवेदनशीलता व कौतुक !
सध्या दिंडीच्या निमित्ताने नियोजनासाठी तसेच मतदान SIR च्या कामासाठी उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड या करमाळा येथे आल्या असता तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या उपस्थितीत देवळालीकरांचा विशेष उल्लेख करत कौतुक केले स्वच्छता दूतांचा सर्वांचा महसूल दिनी प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करावा असे सांगितले आहे. तर तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी तर आपण स्वतः या श्रमदानाच्या वेळी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे.
वारी काळात देखील विशेष वेळ देत स्वच्छता करणार असल्याचे यावेळी स्वच्छ देवळाली टीम ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले. भविष्यात, स्वच्छता, सुशोभीकरण आणि प्रबोधन या त्रिसूत्री राबवत गावकऱ्यांना गाव म्हणून एकत्र येत संपूर्ण महाराष्ट्रात राजकारणविरहित एकीचा आदर्श “देवळाली पॅटर्न” म्हणून ओळख निर्माण होईल ही या ग्रामस्थांना आशा आहे.


